राज्यातील बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:08 PM2019-12-02T20:08:44+5:302019-12-02T20:12:23+5:30
बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंढे यांच्या ट्विटरवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्तांतरानंतर अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्याने मुंडे यांच्या सेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. आरेतील मेट्रो शेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनबाबतदेखील फेरविचार होऊ शकतो, असे सांगून राऊत यांनी भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.
बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. याबाबतीत सरकारच यावर बोलेल, मात्र बहुचर्चित बुलेट ट्रेनबाबत सरकार स्थापन होण्याआधीपासून आपण बुलेट ट्रेनचे ओझे आमच्या माथी नको ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका शरद पवार यांनीही मांडली असल्याचेही राऊत म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार हा अध्याय संपला असून, विधानसभेत १७० चा आकडा गाठण्यासाठी पवार मेहनत करत होते हे राज्याने पाहिले आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री करतील असे सांगून, त्याबाबत तीन पक्षांमध्ये सूत्र ठरले आहे. विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून, इतर पक्ष काय बोलतात याचा अधिकार त्यांच्याकडे नाही, असेही राऊत म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडेच काय अनेक लोक सेनेच्या वाटेवर आहेत. पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबरला मेळावा बोलाविला आहे, त्यामुळे तेव्हाच त्यांची भूमिका कळेल, असे सांगून भाजपमध्ये असंतोष आहे का यावर मी काहीच बोलणार नाही, असेही संजय राऊत शेवटी यांनी सांगितले.