निर्भिड, निष्पक्ष पत्रकाराच्या जाण्याने समाजाची मोठी हानी, शोकसभेत गणेश धुरींच्या आठवणींनी नाशिककर हळहळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:43 PM2017-12-09T17:43:45+5:302017-12-09T20:31:00+5:30
नाशिक : पत्रकार समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना कोणाचीही भीड न बाळगता निष्पक्षपणे वार्ताकन करीत असतो. विविध आव्हानात्मक स्थितीला समाजाने, समाजप्रतिनिधींनी कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शनही करतो. ही समाज मार्गदर्शकाची भूमिका समर्थपणे पेलतांना गणेश धुरी यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. अशा निर्भिड व निष्पक्ष पत्रकाराच्या अकाली निधनामुळे समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाल्याच्या भावना विविध क्षेत्रतील मान्यवरांनी रावसाहेब थोरात सभागृहातील शोकसभेत व्यक्त केल्या.
लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश कृष्णराव धुरी यांचे बुधवारी रात्री अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शानिवारी (दि.9) नाशिक जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा परिषदेतील त्यांचे स्नेही व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. गणेश धुरी यांच्या आठवणींना उजाळा देतांना नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारीता आदि विविध क्षेत्रतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. धुरी यांनी समाजात कौटुंबिक जिव्हाळ्य़ाचे संबध तयार केल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने जिल्हा परिषदेतील महिला वर्गात बंधुत्वाचे नाते निर्माण केल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व उपाध्यक्ष नयना गावीत म्हणाल्या.यावेळी महापौर रंजना भानसी,आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी मंत्री शोभा बच्छाव, महाराष्ट्र पत्रकार संघाचे सरचिटणीस यशवंत पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी आमदार शिरिश कोतवाल, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार,माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, आरपीआय नेते प्रकाश पगारे, माजी सभापती प्रकाश वडजे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य अधिकारी अनिरुद्ध लांडगे, अधिकारी महासंघाचे बाळासाहेब घोरपडे यांनीही याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही पत्रद्वारे शोकसंदेश पाठवून धुरींच्या निधनामुळे दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली.
भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांनी धुरी यांच्या निधनानंतर कुटुंबाला आश्वासक पाठबळ देण्यासाठी समाजप्रतिनिधींनी पुढे येण्याचे आवाहन केले. तर लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी गणोश धुरींच्या दु:खद निधनानंतर लोकमत वृत्तपत्रसह समाजही कुटुंबासोबत उभा राहिल्याने त्यांच्या कटुंबाला दुख:तून सावरण्याचे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली. तसेच समाजातील विविध क्षेत्रतील सक्षम व्यक्तींनी धुरी यांच्या कुटुंबाला स्थायी स्वरुपाची मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिक्षण समिती सभापती यतींद्र पगार, क्राँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक विलास शिंदे, राष्ट्रवादीचे दिलीप खैरे, शिवसेनेचे उदय सांगळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णा पाटील बोरगुडे, प्रेस युनीयनचे जगदीश गोडसे आदिंसह विविध पत्रकार तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी सूत्रसंचालन केले.