मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:30 AM2024-07-02T08:30:49+5:302024-07-02T08:32:17+5:30
निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचं अभिनंदन केलं आहे.
Nashik Teacher's Constituency ( Marathi News ) : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर महायुतीच्या किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. दराडे यांना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी अटीतटीची लढत दिल्याने जवळपास २४ तास ही मतमोजणी सुरू होती. मात्र आज सकाळी दराडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अपक्ष विवेक कोल्हे आणि महाआघाडीचे संदीप गुळवे यांचा ९ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचं अभिनंदन केलं आहे.
दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे सुमारे ८ हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र प्रथम पसंतीच्या संभाव्य मतांचा कोटा पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली. दुसऱ्या फेरीअखेर दराडे आघाडीवर होते. शिंदेसेनेचे उमेदवार किशोर दराडे, उद्धवसेनेचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात मतमोजणीत चुरस असली तरी बाद मतांच्या घोळामुळे अधिकृत कोटा घोषित न करता सर्वप्रथमच सर्वच प्रथम पसंतीची मते मोजण्यात आली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१) पडली. सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच ३ मतदान केंद्रात जास्त मतपत्रिका आढळल्याने गोंधळ उडाला. उद्धवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, वसंत गीते, विनायक पांडे यांनी त्यास हरकत घेतली, त्यानंतर त्या केंद्रातील मतपेटी बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर सुरळीत झालेल्या मतमोजणीत पहिल्या ३० हजार मतपत्रिका मोजून त्यातील बाद झालेल्या मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या. त्यानंतर मतमोजणी सुरू करण्यात आली. अर्थात बाद मतांवर घेण्यात आलेले आक्षेप आणि वाढीव मते यामुळे अधिकृत बाद मतांची घोषणा न करताच मतमोजणी करण्यात आली. यावेळी उमेदवारांचे समर्थक मोठ्चा संख्येने उपस्थित होते. औद्योगिक वसाहत परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दोन्ही फेरीत दराडे आघाडीवर...
महायुतीच्या किशोर दराडे यांना दुसऱ्या फेरीत २४ हजार ३९३ अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना १५९८५ तर महाविकास आघाडीच्या संदीप गुळवे यांना १४९९२ मते पडली. मतमोजणीदरम्यान ६४ हजार ८४८ मतपत्रिकांपैकी पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची, दुसऱ्या फेरीत पुढील ३० हजार मतपत्रिकांची तर तिसऱ्या फेरीत उर्वरित ४ हजार ८४८ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. दुसऱ्या फेरीत दराडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मात्र कोल्हे आणि दराडे यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरू होती.
मतांचा कोटा पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यातही प्रथम पसंतीचे बहुमत पूर्ण न झाल्याने अखेर तिसरी फेरी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर सकाळी लवकर अंतिम निकाल घोषित करण्यात आला असून किशोर दराडे यांचा विजय झाला.
बाद मतपत्रिकांचा वाद..
- सकाळच्या सत्रात बाद ठरलेल्या मतपत्रिकांचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झालेला नसल्याने निकाल जाहीर होण्याच्या वेळी त्याबाबत वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र वाद थोडक्यात निभावल्याने दिलासा मिळाला.
अशी झाली मतमोजणी...
- प्रथम सर्व मतपत्रिका जमा करण्यात येऊन त्यातून बाद मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आल्या.
- उमेदवाराच्या अनुक्रमांकनुसार करण्यात आलेल्या कप्प्यांमध्ये प्रत्येकाच्या प्रथम पसंतीच्या मतपत्रिका टाकण्यात आल्या. त्यात महायुतीचे किशोर दराडे दोन्ही फेरीत आघाडीवर होते.