शैक्षणिक साहित्यांनी बहरली बाजारपेठ
By admin | Published: May 16, 2017 12:26 AM2017-05-16T00:26:08+5:302017-05-16T00:26:21+5:30
नाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, मागणी स्थिर असल्याने वस्तूंचे दरही स्थिर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, मागणी स्थिर असल्याने वस्तूंचे दरही स्थिर आहेत. मागणी वाढल्यास भाव वाढू शकतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. दप्तर, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट आदिंसह सर्वच शैक्षणिक साहित्यात यंदा वैविध्यपूर्ण प्रकार पहायला मिळत असून, बच्चेकंपनीची आवड लक्षात घेत त्यात निर्मात्यांनी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
साधारणत: १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून, जूनमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीचा एकदम आर्थिक बोजा पडायला नको म्हणून अनेक पालक मे महिन्यामध्येच थोडीफार खरेदी उरकून घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे मेनरोडसह उपनगरातल्या सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
मुले आपल्या आवडीचे कार्टुन, चित्र, आवडीचे रंग असणाऱ्या वस्तूंचा हट्ट धरत आहेत, तर पालक किंमत, टिकाऊपणा व मुलांची आवड यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून साहित्य खरेदीला ग्राहकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.
दप्तरांमध्ये नेहमीच्या प्रकारांबरोबरच ‘५०० बाय ५०० डेनिअर मटेरियल’, लाईट वेट प्रकार आलेले आहेत. याशिवाय यंदाही ट्रॉली स्कूलबॅगला मागणी आहे. दप्तरांबरोबरच रेनकव्हरलाही मागणी आहे. याशिवाय टिफीनबॅग, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट यांच्यातही भरपूर प्रकार आलेले आहेत. ट्रॉली बॅग ९०० ते १५०० रु., पेन्सिल पाऊच १० ते ३०० रु., रेनकव्हर ४० ते ३०० रुपये, टिफीन बॅग १५ ते ३०० रुपये आदि दरांमध्ये उपलब्ध आहेत.