पुलांच्या बांधकामाआधीच कोट्यवधींचे उड्डाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:13+5:302021-08-14T04:19:13+5:30
महापालिकेच्या दोन्ही उड्डाण पुलांच्या गरजेविषयी सुरुवातीपासून वाद होते. पूल बांधण्यासाठी आधी आग्रह आणि नंतर विरोध करणाऱ्या भाजपने नंतर मूकसंमती ...
महापालिकेच्या दोन्ही उड्डाण पुलांच्या गरजेविषयी सुरुवातीपासून वाद होते. पूल बांधण्यासाठी आधी आग्रह आणि नंतर विरोध करणाऱ्या भाजपने नंतर मूकसंमती दिली. त्यासाठी निधीवरून गोंधळ सुरू होताच. त्यातच आता पूल बांधण्याच्या आतच ठेकेदार कंपन्यांनी त्यात बदल सुचवल्याने अडीचशे कोटी रुपयांच्या पुलाचे महापालिकेकडून इस्टीमेट चुकले की जाणिवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आल्या याविषयी शंका घेतली जात आहे
शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल आणि सिडकाेतील उंटवाडी येथे उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी कमी पडलेला निधी भाजपने स्वतंत्र तरतूद करून अंदाजपत्रकात नोंदवला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी निविदा मागवल्यानंतर ते काम देखील देण्यात आले. एप्रिल महिन्यातच या ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. त्यातून वाद विवाद झडल्यानंतर आता या कंपन्यांनी पुलाच्या ठिकाणी मृद परीक्षणाचे काम सुरू केले हेाते. मध्यंतरी तत्कालीन शहर अभियंता संजय घुगे यांनी डिझाईनच्या दुरुस्तीमुळे थांबवले होते. तेव्हाच नव्या वादाची चाहूल लागली होती.
संबंधित ठेकेदार कंपनीने पुलासाठी एम ४० ऐवजी एम ६० सिमेंट वापरण्याबरोबरच अन्य काही बदलानुसार काम करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे पुलाच्या किमतीत फरक पडणार असून तब्बल ४४ कोटी रुपयांचा खर्च वाढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेत सध्या ठेकेदार सुखाय धेारण सुरू असून कोट्यवधी रुपयांची उड्डाणे घेतली जात आहेत. दोन पुलांचे नारळ फोडण्याच्या आतच हा प्रकार घडल्याने पुलाची किंमत आता तीनशे कोटी रुपयांच्या घरात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे.
कोट...
उड्डाण पुलाच्या सिमेंट ग्रेडबदल तसेच अन्य काही बदलांबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे. मात्र, त्यात कोणताही दर वाढवून मागितल्याचा किंवा किती दर वाढणार याचा उल्लेख नाही.
- शिवनारायण वंजारी, शहर अभियंता, महापालिका
कोट...
उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या आधीच यात काही बदल सुचवण्यात आली असून, ठेकेदार कंपनीकडून वाढीव दर मागितल्याचे कळले आहे, अशाप्रकारे मूळ प्राकलनात वाढीव रक्कम देण्यास विरोध राहील.
- शिवाजी गांगुर्डे, ज्येष्ठ नगरसेवक भाजप
कोट...
सिमेंट ग्रेड बदलण्यासाठी कंपनीने पत्र दिले आहे, परंतु त्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या खर्चात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. मर्यादित खर्चातच हे काम होईल.
- गणेश गीते, सभापती, स्थायी समिती