द्राक्षबागांना कोट्यवधींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:24 PM2021-01-11T19:24:48+5:302021-01-12T01:24:06+5:30
दिंडोरी : तालुक्यात गेल्या २४ तासांत दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यांमुळे द्राक्ष उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
नळवाडी येथील द्राक्ष निर्यातदार कैलास कांगणे व विलास कांगणे या शेतकऱ्यांचे ९० लाखांचे, पाडे येथील शेतकरी सुरेश काशीनाथ नाठे यांच्या दोन एकर बागेचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले. पेपर लावलेल्या व बिगरपेपर द्राक्षबागाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तालुक्यातील अन्य गावातही परिपक्व (पाणी उत्तरलेल्या) बागांचेही मोठे नुकसान झाले.
तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे देण्यासाठी आलेल्या सर्वच द्राक्षबागांना तड्यांचा मोठा फटका बसला आहे. कालपर्यंत या द्राक्षबागाचे कमी प्रमाणात नुकसान दिसत होते. मात्र, रात्री झालेल्या पावसामुळे साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ज्या द्राक्षबागांची अर्ली छाटणी झालेली आहे, त्या बागा देण्यासाठी आलेल्या होत्या. काही ठिकाणी सुपर मार्केटसाठी खुडा चालू होणार होता. सध्या या सुपर मार्केटचा बाजारभाव ८० ते ९० रुपये प्रति किलो आहे. त्या सर्वात जास्त नुकसान हे निर्यातक्षम द्राक्षबागाचे झाले आहे. आतापर्यंत फक्त पाऊस झाल्यास पेपर लावलेल्या द्राक्षबागाचे नुकसान होत असे. मात्र, या अवकाळी पावसाने बिगर पेपर द्राक्षबागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
डावणी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव
तालुक्यात ज्या द्राक्षबागाची यंदा उशिरा छाटणी केली. त्या बागानाही अवकाळी पावसाचा फटका बसला. या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात डावणी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येते आहे. मागील द्राक्ष हंगामात कोरोनामुळे उत्पादकाचे मोठे नुकसान झाले होते, साधे भांडवलही द्राक्ष उत्पादकाना वसूल करता आले नाही. त्यामुळे मागील वर्षी उधारीत घेतलेल्या औषधाचे पैसेही देता आलेले नाही. यंदा उत्पादक कसा तरी उभा राहून त्यांने उधार उसनवारी करून आपली द्राक्षबागा मोठ्या कष्टाने तयार केली होती. मात्र, चालू वर्षी पुन्हा अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे.