एक्साइड लाइफ इन्शुरन्सला बिमा लोकपालचा दणका
By admin | Published: November 15, 2015 11:14 PM2015-11-15T23:14:47+5:302015-11-15T23:15:33+5:30
फसवणूक : तक्रारदाराला व्याजासह पैसे परत
नाशिक : बंद पडलेल्या इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस देण्याचे आमिष दाखवत नवीन पॉलिसी लादणाऱ्या आणि ३० हजार रुपये हडपणाऱ्या बंगळुरू येथील एक्साइड लाइफ इन्शुरन्स या कंपनीला पुणे येथील बिमा लोकपालने तक्रारदारास व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिल्यानंतर कंपनीने पैसे परत केले असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत यांनी दिली आहे.
‘तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर ८० हजारांचा बोनस जाहीर झालेला आहे. पण तो मिळविण्यासाठी तुम्हाला ३० हजार रुपये भरावे लागतील’ असा फोन बंगळुरू स्थित एक्साइड लाइफ इन्शुरन्स या कंपनीच्या प्रतिनिधीकडून अजंली दिंडोरकर यांना आला. दिंडोरकर यांनी यापूर्वी बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती, परंतु ती २००८ मध्येच बंद झाली होती. परंतु बंद झालेल्या पॉलिसीवरही बोनस मिळतो ही माहिती दिंडोरकर यांना नवीच होती. पॉलिसीचा काही नियम असेल म्हणून अंजली दिंडोरकर यांनी ३० हजार रुपये आवश्यक त्या कागदपत्रांसह कंपनीला पाठविले, परंतु ८० हजारांचा बोनस तर दूरच त्याऐवजी कंपनीने नवीन पॉलिसी करून पाठविली आणि प्रीमिअम भरण्याचा तगादा सुरु केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिंडोरकर यांनी ज्यांनी बोनसचा फोन केला होता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळायला लागली.
अखेर दिंडोरकर यांनी ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत यांच्याशी संपर्क साधला. भगत यांनी संपूर्ण केसचा अभ्यास करत मुंबई व पुणे येथील बिमा लोकपालकडे लिखित तक्रार देण्याचा सल्ला दिंडोरकर यांना दिला. त्यानुसार दिंडोरकर यांनी तक्रार केल्यानंतर त्यावर दि. १६ आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली.
दिंडोरकर यांनी लोकपालांसमोर स्वत:च बाजू मांडली. युक्तिवादानंतर लोकपालाने एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीने १५ दिवसात ३० हजार रुपये ९ टक्के व्याजासह अंजली दिंडोरकर यांना परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बिमा कंपनीने दिंडोरकर यांना व्याजासह ३४ हजार रुपये ५२५ रुपये परत केले आहेत. (प्रतिनिधी)