मनपा कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी
By admin | Published: September 7, 2015 11:25 PM2015-09-07T23:25:25+5:302015-09-07T23:26:48+5:30
मनपा कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी
आढावा बैठक : मनपा आयुक्तांचा निर्णयमालेगाव : येथील महानगरपालिका स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांची आता यापुढे बायोमेट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. येथील मनपा आयुक्त कार्यालय दालनात शहर स्वच्छता संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मनपा नवनियुक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक झाली. त्यात शहरातील विविध प्रभागातील स्वच्छतेचे चाललेले कामकाज, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या, स्वच्छतेसाठी उपलब्ध व कार्यरत वाहने याविषयीची माहिती घेण्यात आली.
शहर स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी काही प्रभागात वेळेवर हजर नसतात. तसेच काही कर्मचारी हे वेळेआधीच निघून गेलेले असतात. याविषयीच्या तक्रारींचा ऊहापोह करण्यात आला. त्यामुळे लवकरच मनपा स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची येण्याची व जाण्याची वेळ नोंदण्यासाठी बायोमेट्रीक यंत्र शहरातील सर्व १४ स्वच्छता कर्मचारी हजेरी केंद्रावर लावण्याचे निर्देश मनपा आयुक्त बोर्डे यांनी दिले. तसेच स्वच्छता कामात आढळलेल्या त्रुटींमुळे स्वच्छतेसाठी नियुक्त परंतू सध्या बंद असलेली सर्व वाहने येत्या १५ दिवसात दुरुस्त सुरु करावीत, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयाबाबत संबंधित प्रभाग अधिकारी यांनी आगामी तीन दिवसात आपला अहवाल सादर करावा असे आदेशही त्यांनी दिले. मूळ स्वच्छता कर्मचारी असणारे परंतू मनपाच्य विविध कार्यालयात काम करणाऱ्या सर्व सफाई कामगार यांची तीन दिवसात मूळ जागेवर नियुक्ती करण्यात येईल.तसेच एका आठवड्यात पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात येईल. मनपात कार्यरत सर्व अधिकारी - कर्मचारी यांना ओळखपत्र बंधनकारक करणार असेही आयुक्त बोर्डे यांनी सांगितले. यावेळी मनपा स्वच्छता निरीक्षक गोविंद परदेशी, शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्यासह मनपाचे संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होेते.
सोयगाव महाविद्यालयात रासेयो सुरू
मालेगाव : सोयगाव कला, वाणीज्य महाविद्यालयात डॉ. तुषार शेवाळे यांच्या हस्ते रासेयोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. एच. एम. शिरसागर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. मनोज जगताप यांनी केले. यावेळी डॉ. पी. टी. निकम, एम. डी. सोनवणे, नरेंद्र निकम, सचिन पवार, वाय. एस. शेवाळे आदि उपस्थित होते़
यु.पी. शिरुडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल खैरनार यांनी केले. आभार प्रतिभा खैरनार यांनी मानले.