जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब
By admin | Published: April 20, 2017 12:47 AM2017-04-20T00:47:45+5:302017-04-20T00:47:57+5:30
नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे
नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. ए. आर. सुपाते यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील महाराष्ट्र एनव्हायरमेन्ट इंजिनिअरिंग ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च अकॅडमीत सोमवारी जैविक कचरा व्यवस्थापनावर (बायोमेडिकल वेस्ट) दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुपाते म्हणाले की, २०१६ च्या जैविक कचरा व्यवस्थापन नियमानुसार जैविक कचऱ्याची योग्य आणि वेळेत विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाचे मुख्य अधिकारी, व्यवस्थापक, संस्थेचे अध्यक्ष, सीईओ आदिंवर आहेत.
याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच समिती स्थापन करून व स्वत:ची वेबसाईट करून त्यावर दरवर्षी जैविक कचरा व्यवस्थापनाचा अहवाल
प्रकाशित करावा. जो जैविक कचरा करतो, संकलन करतो, वाहतूक करतो, विल्हेवाट लावतो त्यांना २०१६ चे नियम लागू आहेत.
रुग्णालय, लॅब, दवाखाने, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक संस्था, ब्लड बॅँक, प्रथमोपचार केंद्रे आदिंनी जैविक कचऱ्याची योग्य जागी, योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे, असे डॉ. सुपाते यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक एस. पी. जगदाळे, मनपा मुख्य आरोग्याधिकारी, डॉ. विजय डेकाटे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे मुख्य अधिकारी आर. व्ही. पाटील, उपमुख्य अधिकारी आनंद कुडे, डॉ. सुरज भांगे आदि मान्यवर उपस्थित होते. दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत बंगळुरूचे डॉ. अर्जुनन्, डॉ. बी. एस. नंदकुमार, डॉ. दिनेश राजाराम, समीर हुडेलकर, डॉ. अर्जुन इसाक, चेतन सावंत आदिंनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा राज्य शासन, गेफ, युनिडो, बंगळुरूचे रामय्या मेडिकल कॉलेज, एमएसआरएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यातील निमंत्रित रुग्णालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)