चंदनपुरी शिवारात बायोडिझेल पंप सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:43 IST2020-09-03T00:02:27+5:302020-09-03T01:43:41+5:30
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे.

मालेगाव तालुक्यातील मनमाड रोडवरील चंदनपुरी शिवारातील बायोडिझेल पंप सील करताना नायब तहसीलदार डी. बी. वाणी, विकास पवार, पुरवठा निरीक्षक अशोक सावणे, मंडळ अधिकारी एस. डी. काळे, आर. झेड. धाडी.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे.
चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवरील गट क्र. ३९१/ब येथे अनधिकृत बायोडिझेल विक्रीचा पंप सुरू असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार राजपूत यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश नायब तहसीलदार डी.बी. वाणी, विकास पवार, पुरवठा निरीक्षक अशोक सावणे, कौळाणे मंडळ अधिकारी एस. डी. काळे, तलाठी आर. झेड. धाडी, मधुकर बच्छाव यांना दिले होते. त्यानुसार संबंधितांनी चौकशी केली असता पंपावर संदीप नंदू खैरनार व सुमित अरुण पगारे हे कर्मचारी असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे पंपाच्या व बायोडिझेल विक्री बाबतच्या परवानगीबाबत विचारले असता केवळ चंदनपुरी ग्रामपंचायत व वैधमापन विभागाची परवानगी आढळून आली. इतर विविध प्रकारच्या ११ परवानगी आवश्यक असताना त्या आढळून आल्या नाहीत. विनापरवानगी बायोडिझेलची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. तत्कालीन ६ हजार ४९४ लिटर डिझेल, बायोडिझेल वाटपाचे डिस्प्ले, साठा करण्याची टाकी, पत्र्याच्या शेडची कॅबिन सील करण्यात आली आहे. याप्रकरणी तहसीलदार राजपूत यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या धडक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवानगी बायोडिझेल विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.