नाशिकमध्ये जैवविविधता चांगली, मात्र टिकवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 07:07 PM2018-09-04T19:07:20+5:302018-09-04T19:20:43+5:30
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील पर्यावरणीय सर्वेक्षण एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्या अंतर्गतच जैवविविधता स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात अजूनही नाशिक शहराची जैवविविधता टिकून राहिल्याचे आढळले आहे.
संजय पाठक,
नाशिक :नाशिकचे हवा पाणी चांगले असल्याने नाशिकमध्ये जैवविविधता टिकून असून, विशेष करून पक्षी आणि फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघता हे सर्वेक्षणातच सिद्ध झाले आहे. तथापि, हे चित्र असेच टिकून राहील असे मात्र नाही. अगदीच शास्त्रीय बाब तपासायची असेल तरी शहरा प्रतिहेक्टर १३२० झाडे लावली जात असून, पर्यावरणातील जैवविविधता टिकण्यासाठी मात्र अशाच प्रकारे प्रति हेक्टर दोन ते अडीच हजार प्रति झाडे लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील पर्यावरणीय सर्वेक्षण एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्या अंतर्गतच जैवविविधता स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात अजूनही नाशिक शहराची जैवविविधता टिकून राहिल्याचे आढळले आहे.
नाशिक महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ २५९ चौरस किलोमीटर आहे. महापालिकेच्या या अगोदर कुठेही उद्याने करण्याचे धोरण विद्यमान आयुक्तांना भलेही खटकत असेल, परंतु सोसायट्यांच्या खुल्या जागेतही उद्याने करण्यात आल्याने आज शहरात ४८१ उद्याने आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १०, ७८,३९४.०० चौरस मीटर इतके झाले आहेत. याशिवाय रत्याच्या कडेला झाडे लावण्यात आली असून, काही भागांत हरित पट्टेदेखील तयार करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम अजूनही पर्यावरण टिकण्यात झाला आहे.
शहरात झालेल्या सर्र्वेक्षणानुसार पर्यावरणाच समतोल राखणाऱ्या प्राण्यांचा शोध घेण्यात आला. निसर्गातील एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण परिसंस्था कोलमडते. त्याचा विचार करता नाशिक महापालिकेच्या हद्दीतील जीवसृष्टीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये मुख्यत्वे करून फुलपाखरे आणि पक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले असता फुलपाखरांच्या २४ प्रजाती आढळल्या असून, पक्षांच्या २८ प्रजाती आढळल्या आहेत.
फुलपाखराची दुर्मिळ प्रजाती
फुलपाखरे आणि पतंग निसर्गातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. फुलपाखरू समृद्ध जीवनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. फुलपाखरू आणि पतंगांचे पर्यावरणदृष्ट्या मौल्यवान असतात त्याचे कारण म्हणजे पर्यावरण संवर्धनातील ते महत्त्वाचा घटक आहेत. तसेच पृथ्वीवरील संजीवकाचा ते एक भाग असून, समृद्ध जैवविविधतेचे ते एक प्रतीक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेता नाशिक शहर परिसरात एकूण २४ प्रजाती आढळल्या आहेत. यात इंडियन क्रो, ब्ल्यू, टायगर आडणी ग्रास यलो बटरफ्लाय यांचा समावेश होते. १९७२ सालच्या वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार कॉमन क्रो या प्रजातीच्या फुलपाखराची नोंद १९७२ वन्यजीव (संरक्षण) कायद्यामधील शेडूल्ड चारमध्ये करण्यात आला आहे.
पर्यावरण परिसंस्थेमध्ये पक्षी महत्त्वाचा घटक असून, त्यांची विविधता ही चांगल्या आणि सौजन्यपूर्ण अधिवासाची लक्षणे मानली जातात. अभ्यासादरम्यान नाशिकध्ये २८ प्रजातींचे पक्षी आढळले असून, मैना, कावळा, कबूतर, बुलबुल, सनबर्ड, कोतवाल, गाय, बगळे, छोटा रघू या पक्षांची नोंद आहे. नाशिकमध्ये संरक्षित प्रजातीचा पक्षी आढळेला नाही त्याप्रमाणे अनेक प्रजातीचे पक्षी हे पाण्याच्या परिसरात वास्तव्यास असतात.
.....
नाशिकमध्ये महापालिकेने मोठ्या प्रमाणात उद्याने साकारली आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात येत असले तरी हेक्टरी १३२० इतकी झाडे असे प्रमाण असून, ही संख्या खूपच कमी आहे. त्याऐवजी दोन ते अडीच हजार प्रति हेक्टर झाडे लावण्याची गरज असून त्याचबरोबर लावलेली झाडे जगतात किंवा नाही याबाबत त्याची नोंद ठेवणे मात्र आवश्यक आहे.
महापालिकेच्या हद्दीत पर्यावरण संतुलन आता दिसत असले तरी भविष्यात अनेक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने नाशिक महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात रहिवासी आणि अन्य क्षेत्रांचा वापर वाढविल्याने हरित क्षेत्र केवळ २० टक्के इतकेच शिल्लक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे आणि रस्ता रूंदीकरण होत असल्याने महापालिकेकडून वृक्षतोड करण्यात येते त्यामुळेदेखील भविष्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
महापालिकेचा स्वतंत्र पर्यावरण विभाग असला तरी प्रत्यक्षात हा विभाग खूप सक्षम नाही. महापालिकेची वृक्षप्राधीकरण समिती न्यायालयाच्या कचाट्यात सापडली आहे, तर जैवविविधता समिती नियुक्त करण्याचे शासनाचे आदेश असूनही तशी समिती नियक्त करण्यात आलेली नाही.