सफाई कामगारांसाठी बायोमेट्रिक सिस्टीम
By admin | Published: January 14, 2015 11:50 PM2015-01-14T23:50:14+5:302015-01-14T23:50:34+5:30
हजेरी शेड्सवर यंत्रणा : १८३१ कामगारांची नोंदणी पूर्ण; आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार
नाशिक : फिल्डवर सफाई कर्मचारी हजर राहत नाहीत अथवा एकाच्या नावावर दुसराच काम करत असल्याच्या तक्रारींना आता आळा बसणार असून, महापालिकेमार्फत लवकरच शहरातील सफाई कामगारांना बायोमेट्रिक सिस्टीम लागू होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा विभाग मिळून १८३१ सफाई कामगारांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्याचे काम पूर्ण केले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.
महापालिकेच्या अनेक प्रभागांमध्ये सफाई होत नसल्याची आणि सफाई कर्मचारी हजर राहत नसल्याच्या तक्रारी महासभांमध्ये नगरसेवकांनी वारंवार केल्या आहेत. काही भागात सफाई कामगारांच्या संख्येबाबत असमतोल असल्याने व्यवस्थित साफसफाई होत नसल्याचीही ओरड नेहमी ऐकायला मिळत असते. मागील महासभेत डेंग्यूविषयी आलेल्या लक्षवेधीवर नगरसेवकांनी धूर व औषध फवारणीबरोबरच स्वच्छतेबाबतही प्रशासनाला धारेवर धरले होते. याचवेळी सफाई कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यास तत्काळ अनुकूलता दर्शवित आरोग्य विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले
होते.
आयुक्तांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने शहरातील पालिका सफाई कामगारांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्याचे काम विभागनिहाय सुरू केले होते. त्यानुसार सिडको विभागातील १२८ पैकी १२६, पंचवटीतील २७५ पैकी २६०, पश्चिम विभागातील ३३३ पैकी ३३०, नाशिकरोड विभागातील ४२३ पैकी ४१०, पूर्व विभागातील ४९२ पैकी ४८३ आणि सातपूर विभागातील सर्वच्या सर्व १४८ कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक सिस्टीमसाठी नोंदणी करण्यात आली असून, मलेरिया विभागातील ६० पैकी ५१ कर्मचाऱ्यांच्याही अंगठ्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. एकूण १८३१ कामगारांची नोंदणी पूर्ण झाली असून, शिल्लक राहिलेल्या ६० कर्मचाऱ्यांची नोंदणी लवकरच पूर्णत्वाला जाईल.
शहरात महापालिकेचे ६३ हजेरी शेड्स आहेत. या शेड्सवर बायोमेट्रिक सिस्टम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या गैरहजेरीविषयी येणाऱ्या तक्रारींना आळा बसणार आहे. दरम्यान, सफाई कामगारांना बायोमेट्रिक सिस्टम कार्यान्वित करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून लवकरच ती लागू करण्यात येणार असल्याचे डॉ. बुकाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)