खातेप्रमुखांना एप्रिलपासून बायोमेट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 01:44 AM2022-03-25T01:44:46+5:302022-03-25T01:45:40+5:30
कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे केल्यानंतर आपल्या मनमर्जीने कार्यालय गाठणाऱ्या खातेप्रमुखांचा अनुभव खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाच आल्याने आता येत्या १ एप्रिलपासून सर्वच खाते प्रमुखांनादेखील कार्यालयीन वेळेत हजर होण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसे आदेशच सर्व खाते प्रमुखांना बजावण्यात आले आहेत.
नाशिक : कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे केल्यानंतर आपल्या मनमर्जीने कार्यालय गाठणाऱ्या खातेप्रमुखांचा अनुभव खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाच आल्याने आता येत्या १ एप्रिलपासून सर्वच खाते प्रमुखांनादेखील कार्यालयीन वेळेत हजर होण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसे आदेशच सर्व खाते प्रमुखांना बजावण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींची सत्ता संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट सुरू झाल्याने त्याचा अनुभव आता प्रत्यक्षात येऊ लागला असून, बुधवारी (दि.२४) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सकाळी अकरा वाजता बोलविलेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीस बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कंकरेज व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे आदी अधिकारी उशिराने दाखल झाल्याने बनसोड यांनी त्यांना फैलावर घेतले होते. कार्यालयीन कर्मचारी वेळेत हजर होत असतील तर अधिकाऱ्यांनीही वेळेवर येणे अपेक्षित असून, अधिकारीच कार्यालयात नसतील तर कर्मचारी काय काम करणार, असा सवाल करीत, साऱ्यांनीच वेळ पाळणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा वाद मिटला, असे वाटू लागले असतानाच सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढण्यात आले असून, त्यात नमूद केले आहे की, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीकरिता पावणे दहा वाजेची वेळ ठरवून दिली असतानाही बरेचशे खातेप्रमुख या वेळेत कार्यालयात उपस्थित राहात नसल्याचे निदर्शनास आले आहे. सकाळी अकरा वाजेनंतरही खाते प्रमुख नसतात. याबाबत खातेप्रमुखांकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा पूर्व परवानगी घेतली जात नाही. सदरची बाब कार्यालयीन शिस्तीस धरून नसल्याने १ एप्रिलपासून सर्व खातेप्रमुखांनी बायोमेट्रिक प्रणालीनुसार आपली उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दणक्यामुळे शुक्रवारी सकाळी बहुतांशी खातेप्रमुखांनी वेळेत कार्यालयात हजेरी लावली. तर अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी करावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.