आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:34 PM2021-02-10T14:34:23+5:302021-02-10T14:36:10+5:30
Nashik News : राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळावी तसेच थकीत मानधन मिळावे यासाठी त्यांनी आज पुन्हा बिऱ्हाड मोर्चा काढला
नाशिक- राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळावी तसेच थकीत मानधन मिळावे यासाठी त्यांनी आज पुन्हा बिऱ्हाड मोर्चा काढला आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारे मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता या कर्मचाऱ्यांनी नाशिकच्या आदिवासी विकास कार्यालयावर मोर्चा काढला असुन मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.
कर्मचारी संघर्ष संघटनेने काढलेल्या मोर्चात कोविड19 च्या काळातील शैक्षणिक वर्ष 2020 - 21 वर्षाचे तासिका व रोजंदारी वरील कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे नियुक्ती आदेश व मानधन मिळावे अशी मागणी आहे. त्यासाठी आज सकाळी आडगाव जवळील हॉटेल जत्रा येथून मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, कमलाकर पाटील, संदीप देवरे, प्रीतम शिरसाठ, गोविंद कारभळ, भगतसिंग पाडवी, हेमंत पावरा, मीनाक्षी ठोंगीरे, सीमा वळवी, ताईबाई पवार, मंजुळा गावित, जैता मावची आदी सहभागी झाले आहेत.