जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:23 PM2018-01-29T22:23:05+5:302018-01-29T22:26:27+5:30
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते.
नाशिक : शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बाळकृष्ण दिघे, दशरथ शिरसाठ, निवृत्ती बोराडे, सुनीता जगताप, प्रज्ञा भालेराव यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपूर, मातोरीसह सिडकोच्या स्वानंद भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरापासून निघालेली मिरवणूक तिवंधा चौक, मेनरोड, रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजारातून मार्गस्थ होत गोदाकाठावरून नेहरू चौकमार्गे विश्वकर्मा मंदिराजवळ पोहचली. येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत ‘विश्वकर्मांची किमया, मान्यकरी सारी दुनिया’, ‘बोलो जय विश्वकर्मा’, ‘नवीन पर्व, विश्वकर्मा सर्व’, ‘नाही एक जातीधर्माचा, विश्वकर्मा भूतलावरील सर्वांचा’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक यावेळी समाजबांधवांनी झळकविले. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘सशक्त महिला, सशक्त समाज, सशक्त संघटन’, ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवा’, ‘पाणी वाचवा, इंधन वाचवा’ असा सामाजिक संदेशही घोषवाक्यांच्या फलकांद्वारे देण्यात आला. दरम्यान, जयंती उत्सव समितीच्या वतीने मंदिरामध्ये मागील चार दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सोमवारी दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जात होते.