महान नाटककाराचा जन्मशताब्दी वर्षारंभ उपक्रमाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:39+5:302021-02-20T04:40:39+5:30

धनंजय रिसोडकर नाशिक : भावगर्भ, संदेश देतानाही रसिकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य असलेली डझनावारी नाटके वसंत कानेटकर यांनी रंगभूमीला ...

Birth centenary of great playwright without initiative! | महान नाटककाराचा जन्मशताब्दी वर्षारंभ उपक्रमाविना !

महान नाटककाराचा जन्मशताब्दी वर्षारंभ उपक्रमाविना !

Next

धनंजय रिसोडकर

नाशिक : भावगर्भ, संदेश देतानाही रसिकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य असलेली डझनावारी नाटके वसंत कानेटकर यांनी रंगभूमीला दिली. मात्र, नाशिकमधील त्यांच्या घराच्या स्मृती जशा नामशेष झाल्या, तसेच कानेटकरांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत असताना त्यांनी रंगभूमीला आणि साहित्याला दिलेल्या योगदानाचाही जणू विसर पडल्यासारखेच सर्वांना झाले आहे. त्यामुळेच नाशिकच्या कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक संस्थेने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त एखादा नाट्यमहोत्सव, नाट्यछटा किंवा साहित्यजागर करण्याचा विचार किंवा त्याची अंमलबजावणी का केली नाही? सोयीस्कररित्या त्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले जात असेल तर अन्य स्पर्धा, महोत्सव ऑनलाईन भरवताना हा महोत्सवही निदान ऑनलाईन करण्याचा विचार कुणालाच का सुचला नाही? साहित्य संमेलनाचा उत्सव भरवणाऱ्या नाशिकसारख्या महानगरात या महान नाटककाराबाबत सांस्कृतिक उदासीनता का, हा प्रश्न रसिक मनाला अस्वस्थ करणारा आहे.

मध्यमवर्गीय पांढरपेशा मनाला भावणारी, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, नाट्य रंगतदारपणे खुलवत नेणारी भाषा आणि नाटकातील भावनेचे अचूक मर्म उलगडून दाखवणारा नाट्याविष्कार या सर्व बाबींचा मिलाफ कुणा एकाच नाटककारातच दिसून आला असेल तर तो अर्थातच वसंत कानेटकर यांच्या नाटकांमध्येच. ज्या नाटकांनी मराठी रंगभूमीला अक्षरश: वैभवाचे दिवस दाखवले, त्यात अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, प्रेमा तुझा रंग कसा, रंग उमलत्या मनाचे ही सर्वाधिक गाजलेली नाटके होती. तसेच हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, वादळ माणसाळतंय ही चरित्रात्मक नाटके तर लेकुरे उदंड जाहली हे ऑपेराच्या धर्तीवरील संगीत नाटक, वेड्याचे घर उन्हात हे मनोविश्लेषणात्मक नाटक तसेच छत्रपती शिवराय आणि शिवकालीन संदर्भ असलेली रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवतास भाले फुटतात, तुझा तू वाढवी राजा ही नाटके मराठी रंगभूमीला वेगळे वळण देणारी ठरली होती. वडील आणि प्रख्यात कवी गिरीश यांच्यामुळे साहित्यिक वातावरणात वाढलेल्या कानेटकर यांनी लिहिलेली जन्माचे गुलाम ही त्यांची पहिली कथा वयाच्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध झाली होती. कानेटकरांनी लिहिलेली बहुतांश नाटके ही सुशिक्षित समाजाचे भावविश्व उलगडून दाखवणारी होती. तसेच त्यांच्या नाटकातील संघर्ष हा व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-परिस्थिती, व्यक्ती आणि तिचे अंतर्मन, व्यक्ती आणि समाज यातून प्रबोधन करणारी होती. नाट्यमाध्यमावरील पकड, तसेच रसिकांच्या भावनेचे अचूक मर्म जाणून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात सदैव यशस्वी ठरली. त्यामुळे कानेटकरांचे नाटक म्हणजे हाऊसफुल्ल हे समीकरण चार दशकांहून अधिक काळ कायम होते.

इन्फो

‘नाही चिरा नाही पणती...’

कानेटकर यांचा ‘शिवाई’ नावाचा बंगला कालांतराने पाडून त्याजागी कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असले तरी त्यांच्या स्मृती कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साठवून ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा नाट्य परिषदेच्या वतीने केवळ एक पुरस्कार कानेटकर यांच्या नावाने दिला जातो. त्याव्यतिरिक्त कानेटकर यांच्या कार्याची स्मृती जतन करण्यात आपण कमी पडलो का ? याबाबतचा विचार नाशिकच्याच साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या संस्थांनी आणि त्यांच्या धुरीणांनी करणे आवश्यक आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यात कानेटकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्य महोत्सव भरवण्याचा विचार आहे. मात्र, तो केवळ जन्मशताब्दी वर्षापुरता न राहता तो दरवर्षाचा नियमित उपक्रम होणे आवश्यक आहे. अन्यथा कानेटकरांच्या स्मृती भविष्यात ‘नाही चिरा, नाही पणती...’ अशा झाल्यास नवल वाटू नये.

-------------------------------------------

वसंत कानेटकर जन्मशताब्दी वर्षारंभ विशेष

-----------------------

१९वसंत कानेटकर

Web Title: Birth centenary of great playwright without initiative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.