अभूतपुर्व उत्साहात वडाळागावत प्रेषित मुहम्मद पैगंबरांचा जन्मोत्सव; सजावटीने नटलेल्या मार्गावरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:15 PM2017-12-03T14:15:08+5:302017-12-03T14:18:28+5:30
सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला
नाशिक : ‘इस्लाम’चे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद शनिवारी (दि.२) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वडाळागाव परिसरातूनही सकाळी अभूतपुर्व उत्साहात मिरवणूक (जुलूस-ए-मुहम्मदी) काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
पैगंबर जयंतीनिमित्त आठवडाभरापासून वडाळागाव परिसरात लगबग पहावयास मिळत होती. मिरवणूक मार्गावर सजावटीची तयारीसह मिरवणूकीचे नियोजन केले जात होते. विविध मंडळांकडून वडाळागावातील जामा गौसिया मशिदीपासून संपुर्ण मिरवणूक मार्गावर हिरवे झेंडे, आकर्षक स्वागत कमानी, विद्युत रोषणाई, पवित्र मक्का-मदिना शरीफचे फलकांची उभारणी करण्यात आली होती. तसेच पताका, रंगीबेरंगी फुगे, चमकी लावून परिसर सुशोभीत करण्यात आला होता.
सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ‘नारे तकबीर अल्लाहु अकबर’, ‘नारे रिसालत या रसुलअल्लाह’, ‘ईद-ए-मिलाद, जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणूकीत सहभागी मंडळांचे कार्यकर्ते मार्गस्थ झाले. यावेळी सहभागी सर्व मंडळांकडून पैगंबर यांच्यावर आधारित स्तुतीकाव्य पठण केले जात होते. मिरवणूक गौसिया मशिद, केबीएच विद्यालयामार्गे, खंडेराव चौकातून जय मल्हार कॉलनी, अहमद रझा चौकातून गणेशनगर, सावता माळी कॅनॉल रस्त्याने तैबानगर, मदीनानगर सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधून मार्गस्थ होत गरीब नवाज कॉलनी, माळगल्लीमधून चांदशावली बाबा दर्गाच्या प्रारंगणात पोहचली. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. दरुदोसलाम व फातिहा पठणानंतर अन्नदानाचा नागरिकांनी लाभ घेतला. मिरवणूकीत मोठ्या संख्येने अबालवृध्द सहभागी झाले होते.
एकात्मता व देशाच्या प्रगतीसाठी दुवा
समारोपप्रसंगी धर्मगुरू जुनेद आलम यांनी समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी मुहम्मद पैगंबर यांचा जीवनमार्ग अवलंबविण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी समाजबांधवांना पैगंबरांनी दिलेली मानवता, बंधुता, सदाचाराची शिकवण अंमलात आणावी असे आवाहन केले. यावेळी भारताच्या प्रगतीसाठी व एकात्मतेच्या बळकटीकरीता सामुहिकरित्या प्रार्थना करण्यात आली.
---