कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिक मध्ये माय मराठीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 07:42 PM2020-02-27T19:42:55+5:302020-02-27T19:44:40+5:30
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आला.
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आला.
मराठी दिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच शहरात विविध कार्यक्रम आयोजण्यात आले होते. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचलित रुंग्टा हायस्कूच्या विद्यार्थ्यांनी परिसरातून ग्रंथ दिंडी काढली आणि मराठीचा जयघोष केला. त्यानंतर संस्थेच्या वतीने कवि संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक कमलाकर देसले यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी यात कमलाकर देसले यांच्या ‘मी मराठी, मला मराठीचा अभिमान आहे, ज्ञाना-तुकयाची मराठीच, माझा प्राण आहे’ या कवितेसह राजेंद्र शेळके यांनी सादर केलेली पुण्यवानाला इथे मिळतात ना लेकी, थेट स्वर्गातून अवतरतात ना लेकी, रवींद्र मालुंजकर यांची ‘लेक भूषणा भूषण, थेट प्रश्नाचे उत्तर’ अरुण इंगळे यांची ‘खूप शिकवं पोरी तू, असं लई मोठं व्हय, भोवतीच्या वादळाची, करू नको गय’ राजेंद्र उगले यांची ‘सत्यवानाचे प्राण आणण्या...गेली सावित्री स्वर्गात, फुलेंच्या या सावित्रीने, स्वर्ग शोधला वर्गात’ आदी कवितांना रसिकांची पसंती मिळाली. सार्वजनिक वाचनालयात बाल साहित्यिक मेळावा संपन्न झाला, तर मनसेच्या वतीने सुलेखनकार सुनील धोपावकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
नाशिकच्या सुभाष वाचनालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. याशिवाय कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी प्रतिमापूजन करून महापौर सतीश कुलकर्णी यांनी आदरांजली अर्पण केली. शहरातील विविध शिक्षण संस्था, राजकीय पक्ष आणि अन्य संघटनांच्या वतीनेही मराठी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.