बिटको रुग्णालयात अव्यवस्थेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:37 AM2018-03-01T01:37:02+5:302018-03-01T01:37:02+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक बिटको रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता व झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाºयांची कानउघडणी केली.
नाशिकरोड : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक बिटको रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता व झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाºयांची कानउघडणी केली. तसेच बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करून मनपाच्या विविध विभागाच्या प्रमुखांना समन्वय साधून काम करण्याची सूचना केली. पावसाळ्यापूर्वी नूतन इमारतीचे काम पूर्ण करण्याचा मानस मुंढे यांनी यावेळी व्यक्त केला. तुकाराम मुंढे यांनी बिटको रुग्णालयात दाखल होऊन पाहणी करण्यास सुरुवात केली. मुंढे रुग्णालयात येत असल्याचे समजताच अधिकारी व कर्मचाºयांनी आपआपल्या कार्यालयात स्वच्छता करण्यास सुरुवात केली. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अस्वच्छता दिसताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांची त्यांनी कानउघडणी केली. यावेळी मुंढे यांनी प्रसूती कक्ष, अतिदक्षता विभाग, जळीत विभाग, नवजात बालकांचा विभाग, अपघात विभाग, सर्र्जिकल विभाग, औषधे वाटप विभाग आदींची पाहणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मिळणाºया सोयीसुविधांबाबत विचारणा केली. यावेळी रुग्णांना चांगल्या पद्धतीचे उपचार मिळत नसल्याचे मुंढे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अधिकारी, डॉक्टर व कर्मचाºयांना धारेवर धरले. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी प्रेमाने बोला, उपचारामध्ये हलगर्जीपणा करू नका, स्वच्छता बाळगा अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. मुंढे यांच्या आगमनामुळे सर्वच डॉक्टर, कर्मचारी गणवेशामध्ये आपआपल्या विभागात हजर होते. दरवाजांची झालेली वाताहत, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, फुटलेल्या टाईल्स, खोल्यांमधील खराब झालेला रंग, ट्युबलाईट व पंख्यांची झालेली दुरवस्था, औषधांचा तुटवडा आदी समस्यांबाबत मुंढे यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता उत्तम पवार, प्रभारी कार्यकारी अभियंता सी. बी. अहेर आदींसह विविध विभागांचे प्रमुख व नाशिकरोड मनपा विभागप्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे, या पाहणी दौºयाप्रसंगी एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.
पावसाळ्यापूर्वी नवीन इमारतीचे काम पूर्ण करा
बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या प्रत्येक मजल्याच्या बांधकाम नकाशाची माहिती घेऊन मुंढे यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी मनपा विविध विभागाचा नूतन इमारतीच्या बांधकामाबाबत समन्वय नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाºयांचे कान टोचले. नूतन इमारतीच्या प्रवेशमार्गाबाबत व इमारतीतील काही विभागांबाबत त्यांनी सूचना केल्या. पावसाळ्यापूर्वी नूतन इमारतीचे काम पूर्ण करण्याचा मानस मुंढे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच डॉक्टरांना कायदा पाळावाच लागेल व स्वच्छतेबाबतअनेक त्रुटी आढळल्याचे मुंढे यांनी यावेळी सांगितले.