बिटको रुग्णालयात रुग्णांचा ओघ सकाळीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:12 AM2018-06-24T00:12:24+5:302018-06-24T00:12:43+5:30
मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायंकाळच्या ओपीडीमध्ये अत्यंत अल्प रुग्ण उपचारासाठी आले आहेत.
नाशिकरोड : मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायंकाळच्या ओपीडीमध्ये अत्यंत अल्प रुग्ण उपचारासाठी आले आहेत. बिटको रुग्णालयामध्ये सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत ओपीडीचा वेळ आहे. तर ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी स्वतंत्र ओपीडी असूनल तेथील वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. सर्वांसाठी असलेल्या ओपीडीमध्ये दररोज ३०० हून अधिक व ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी असलेल्या ओपीडीमध्ये दररोज १०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिटको रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर लागलीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बिटको रुग्णालयात रुग्णाच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत २ तास ओपीडी विभाग सुरू करण्यात आला.
सायंकाळी दोन तास ओपीडी सुरू असल्याबाबत माहिती फलक न लावल्याने रुग्णांना याची माहितीच झालेली नाही. त्यामुळे सकाळच्या ओपीडीवरील रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. सकाळच्या ओपीडीच्या वेळेला रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याने रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी यांच्यावरदेखील ताण वाढतो. मात्र सायंकाळी सुरू झालेल्या ओपीडीबाबत रुग्ण, नातेवाईक अनभिज्ञ असल्याने सायंकाळी दोन तासाच्या ओपीडीमध्ये हातावर मोजण्या इतकेच रुग्ण उपचारासाठी येतात. सायंकाळी सुरू झालेली ओपीडी रुग्णांना माहीत झाल्यास सकाळच्या ओपीडीवरील भार हलका होईल. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात, ओपीडी विभागात ओपीडी सुरू व बंद होण्याच्या वेळापत्रकांचा माहिती फलक लावणे गरजेचे आहे.