बिटको रुग्णालयाचा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:44 AM2018-06-19T01:44:47+5:302018-06-19T01:44:47+5:30
नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मोठी रुग्णालये उभारली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केले आहेत़ आरोग्य यंत्रणेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी महापालिकेच्या या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकून रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवित असल्याचे समोर आले आहे़
नाशिक : नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मोठी रुग्णालये उभारली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केले आहेत़ आरोग्य यंत्रणेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी महापालिकेच्या या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकून रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवित असल्याचे समोर आले आहे़ यामध्ये नाशिकरोडचे बिटको रुग्णालय आघाडीवर असून, मे महिन्यापासून रुग्णालयात फिजिशियनच नसल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक महापालिका क्षेत्रातील नाशिकरोड, जेलरोड, दसक, पंचक, एकलहरा, शिंदे, पळसे, लहवित, वडनेर, संसरी या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्यसुविधेसाठी नाशिक महापालिकेचे जे़डी़सी़ बिटको रुग्णालय आहे़ या रुग्णालयात केवळ महापालिका क्षेत्रातीलच नव्हे सिन्नर तालुक्यातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होतात़ या ठिकाणी रुग्णांवर उपचार होणे आवश्यक असताना त्यांना सर्रास जिल्हा रुग्णालयात ट्रान्स्फर केले जात आहे़ विशेष म्हणजे ट्रान्स्फर करताना फिजिशियन नसल्याचे कारण दिले जाते़ बिटको रुग्णालयातील फिजिशियन डॉ़ गरुड हे एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त झाले असून, त्यानंतर रुग्णांची दैना सुरू झाली़
नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरातील विविध ठिकाणी महापालिकेची सहा मोठी रुग्णालये व १२ प्रसूतिगृहे आहेत़ मात्र, बहुतांशी ठिकाणी डॉक्टर नाहीत, रुग्णाची प्रकृती गंभीर आहे अशी कारणे देऊन रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ केली जाते़ पंचवटीतील मायको रुग्णालयात पोहोचलेल्या गर्भवती महिलेची रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांअभावी रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना गतवर्षी घडली होती़ महापालिका दरवर्षी आरोग्य सुविधेवर कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास टाळाटाळ केली जाते़ रुग्णांना सर्रास जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याने जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत असून, त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे़ शहरवासीयांनी चांगली आरोग्यसेवा मिळेल यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनीच प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे़
दोन हजाराहून अधिक रुग्ण
नाशिक महानगरपालिकेच्या जेडीसी बिटको हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात ट्रान्स्फर करण्यात आलेल्या रुग्णास देण्यात आलेल्या पावतीवर बुक नंबर ४३ व पास नंबर ४६ असा उल्लेख आहे़ साधारणत: एक बुक ५० पानांचे गृहीत धरल्यास आतापर्यंत दोन हजार १९६ रुग्ण जिल्हा रुग्णालयात ट्रान्सफर केल्याचे समोर दिसून येते़ विशेष म्हणजे रुग्णांच्या पासवर फिजिशियन नसल्याचा सर्रास उल्लेख केला जातो़
एप्रिलपासून फिजिशियन नाही
जिल्हा रुग्णालयात सर्रास रुग्ण पाठविण्याबाबत महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांशी संवाद साधला असता, त्यांनी फिजिशियन डॉ़ गरुड एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले़ तेव्हापासून बिटको रुग्णालयात फिजिशियन नसल्याचे सांगून रुग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर हे रुग्णावर उपचार करायचा वा जिल्हा रुग्णालयात पाठवायचे याबाबत निर्णय घेतात़ अडचण असल्यास पेशंटला मला भेटण्यास, सांगा असेही उत्तर या वैद्यकीय अधिकाºयाने दिले़