बिटको रुग्णालयात पुरेसे कर्मचारी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:38+5:302021-04-05T04:13:38+5:30
नाशिक : नाशिकरोड परिसरातील कोरोनाबाधितांसाठी नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील विविध अडचणी दूर करण्यात येतील, तसेच दोन ...
नाशिक : नाशिकरोड परिसरातील कोरोनाबाधितांसाठी नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील विविध अडचणी दूर करण्यात येतील, तसेच दोन दिवसांत पुरेसे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिले.
नाशिक शहर परिसरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, अनेक रुग्ण दगावत आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभापती गणेश गिते यांनी नुकतीच बिटको रुग्णालयाला भेट दिली आणि अडचणी समजावून घेतल्या.
गिते यांनी नवीन बिटको कोरोना रुग्णालय, तसेच जुन्या बिटको रुग्णालयाचीही पाहणी केली. नगरसेवक जगदीश पवार, डॉ. रत्नाकर पगारे, डॉ. जितेंद्र धनेश्वार, डॉ. अभय सोनवणे, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. धनेश्वार यांनी रुग्णालयातील सुविधा आणि समस्यांची माहिती देताना या रुग्णालयात औषधसाठा पुरेसा आहे. तसेच सुरक्षारक्षकांची संख्या पुरेशी असली तरी वैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले. त्यातच कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने उपलब्ध आराेग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे पुरेसे वैद्यकीय, तसेच इतर कर्मचारी त्वरित देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर गिते यांनी दोन दिवसांत आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जुन्या बिटको रुग्णालयाचे प्रभारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी गिते यांना तेथील सुविधांची माहिती दिली, तर नवीन बिटको रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णाला आजार असेल तर त्याला प्रथम कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले जाते. दोन दिवसांनी चाचणीचा अहवाल येईपर्यंत रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णावर प्रथम औषधोपचार करून मग चाचणी करण्यास सांगावे, अशी नगरसेवक जगदीश पवार यांनी मागणी केली आहे.
इन्फो...
मनपाच्या जुन्या बिटको रुग्णालयात फिजीशियन नसल्याने गरोदर महिला, अस्थमा आदी रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना बिटकोत दाखल करुन न घेता जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. तेथेही आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती नगरसेवक जगदीश पवार यांनी दिली. यावेळी सभापती गणेश गिते यांनी जुन्या रूग्णालयात देखील तातडीने फिजीशियन देण्याबाबत निर्देश देण्यात येईल, असे सांगितले.