लोकसहभागातून दोन ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प बिटकोला प्रदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:25+5:302021-06-01T04:11:25+5:30
नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाच्या विस्फोटानंतर शहरातील चार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन महापालिकेसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीचा निर्णय ...
नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाच्या विस्फोटानंतर शहरातील चार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन महापालिकेसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीचा निर्णय घेऊन त्यासाठी ४५ लाखांचा निधी उभारला होता. त्यासाठी नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद आणि सीओईपी माजी विद्यार्थी आणि जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक प्राईड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या निधीतून उभारण्यात आलेले दोन ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत बिटकोला प्रदान करण्यात आले.
या प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी आयुक्त कैलास जाधव, प्रख्यात उद्योजक अशोक कटारिया, अरविंद महापात्रा, उमेश राठी, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अभियंते चव्हाणके, नीलेश साळी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, अभियंते व चारही संघटनांच्या मोजके प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त कैलास जाधव यांनी चारही संघटनांचे त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका परिक्षेत्रात लोकसहभागातून उभा राहिलेला हा पहिला प्रकल्प असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. या प्रकल्पाकरिता समन्वयक म्हणून संदीप फाऊंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी कामकाज पाहिले. त्याशिवाय उद्योजक, अशोक कटारिया अरविंद महापात्रा, अरविंद कुलकर्णी, उमेश राठी, ऋषिकेश वाकदकर, नदीम शेख. मकरंद सावरकर, केतन राठी. विजय बाविस्कर, कैलास पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांचे मोलाचे योगदान दिले.
इन्फो
महिनभरापासून पाठपुरावा
एप्रिल महिन्यापासून नाशिकचा सर्वाधिक तातडीचा प्रश्न हा ऑक्सिजन पुरवठ्याचा बनला होता. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांचे प्राण ऑक्सिजन बेडअभावी जात आहेत. तसेच काही रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन बेडची सुविधा असूनही तिथे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांनादेखील प्रवेश मिळत नव्हता. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या या चार संघटनांनी महिनाभरापासून निधी जमवण्यासह पाठपुरावा करून ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पाच्या कामकाजाला चालना दिली.
इन्फो
दररोज ६८ जंबो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती
या दोन पीसीए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला साधारणपणे ६८ जम्बो सिलिंडर इतका ऑक्सिजन तयार होऊ शकणार आहे. त्यामुळे दिवसाला किमान शंभरहून अधिक नागरिकांच्या ऑक्सिजनची पूर्तता या प्रकल्पाच्या माध्यमातून करता येणार आहे. या चारही संघटनांच्या सदस्यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी जमविलेल्या ४५ लाखांपैकी ३८ लाखांचा निधी प्रकल्पासाठी तर प्रकल्पाच्या मेंटेनन्ससाठी ७ लाखांच्या निधीचा उपयोग मेंटेनन्ससाठी करण्यात येणार आहे.
फोटो
३१ ऑक्सिजन