बिटको कोरोना सेंटर झाले निम्मे रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:11+5:302021-05-25T04:15:11+5:30
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनासह सर्व वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली होती. शहरातील सर्वात मोठ्या मनपाच्या बिटको ...
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनासह सर्व वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली होती. शहरातील सर्वात मोठ्या मनपाच्या बिटको कोरोना सेंटरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ८०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होते. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक वणवण करत फिरत होते, मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन व्यवस्थित नीट होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोनाची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही अवघ्या पाच ते सहा टक्क्यावर येऊन ठेपल्याने कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मोठा हातभार लागला आहे.
गेल्या पंधरवड्यात बिटको कोरोना सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सर्व स्तरावरून प्रयत्न करत होते. मात्र आता कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यामुळे बिटको कोरोना सेंटरमध्ये फक्त ३४२ रुग्ण उपचार घेत आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटरवर १८ रुग्ण, ऑक्सीजन बेडवर २६० व सर्वसाधारण बेडवर १६४ रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वसाधारण बेडवरील रुग्ण लवकरच घरी जातील. त्यानंतर ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजनची लेव्हल व्यवस्थित होताच त्यांना सोडून दिले जाईल. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत यामधील बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी जातील असे बिटको कोरोना सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र ज्ञानेश्वर यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्ण घरी येऊन बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच कोरोनाची टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी असल्याने संबंधित रुग्ण, नातेवाईक, मित्रपरिवार त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.