नाशकात मोकाट कुत्र्यांनी घेतला दोघांना चावा
By श्याम बागुल | Published: September 6, 2018 03:29 PM2018-09-06T15:29:18+5:302018-09-06T15:30:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आहे
नाशिक : उद्यम रायगड सोसायटी परिसरात बुधवारी सकाळी मोकाट कुत्र्यांनी दोन जणांना घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, परिसरात मोकाट कुत्र्यांनी उपद्रव मांडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका लहान बालकाच्या अंगावर चार ते पाच कुत्र्यांनी धाव घेऊन त्याला चावा घेतला, ही घटना पाहणा-या नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावले मात्र त्यानंतर थोड्या वेळातच आणखी थोडे पुढे एका इसमाच्या पायाला चावा घेऊन कुत्रे पसार झाले. लागोपाठच्या या घटनांनी परिसरात दहशत निर्माण झाली असून, गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आहे. श्रद्धाविहार कॉलनी, राजीवनगर झोपडपट्टी, जिल्हा परिषद कॉलनी, गजानन महाराज रस्ता, महारुद्र कॉलनी, कमोदनगर, शास्त्रीनगर, विनयनगर, साईनाथनगर, भारतनगर, शिवाजीवाडी, पांडवनगरी, मोदकेश्वर मंदिर परिसर आदी भागातील रहिवासी मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला वैतागले असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाला धारेवर धरून उपयोग नाही
पूर्ण प्रभाग समितीच्या सभेत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम थंडावल्याने इंदिरानगर परिसरात त्यांचा उपद्रव वाढल्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे व अॅड. श्याम बडोदे यांनी प्रशासनास धारेवर धरले होते. परंतु तरीही महापालिकेने त्याची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात असून, मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेचे वाहन आले असता, कुत्रे परिसरातून गायब होऊन जातात आणि वाहन गेल्यावर पुन्हा रस्त्यावर येतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.