कडाक्याच्या थंडीत गरजू मुलांना मिळाली स्वेटरची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 03:34 PM2020-12-16T15:34:55+5:302020-12-16T15:35:30+5:30
सिन्नर: शहरापासून जवळच असलेल्या पांगारवाडी येथील मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबातील ८२ मुलांना उबदार कपडे (स्वेटर) देण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पांगारवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सिन्नर-पास्ते मार्गावर पांगारवाडी शिवारात मोलमजुरी करणारी आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. मूलभूत सुविधाही तेथे पोहोचलेल्या नाहीत. कडाक्याची थंडी असल्याने मुलांना उबदार कपड्यांची गरज होती. त्याची आवश्यकता विचारात घेऊन नगरसेवक पंकज मोरे यांनी वाडीतील चार ते चौदा वयोगटातील मुलांची माहिती घेतली आणि स्वखर्चातून या उपक्रमाचे नियोजन केले. स्वेटर मिळाल्याने मुलांसह त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. मोरे यांनी यापूर्वी वाडीत याच मुलांना शैक्षणिक साहित्य वितरीत केले आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षकांसोबत संपर्क साधून वाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या ऑफलाइन शिक्षणाची माहिती घेतली. लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्यावतीने दिवाळीच्या काळात या वस्तीवर फराळ वाटप करण्यात आले होते. येथील नागरिकांना मदतीसाठी सामाजिक मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहेत. यावेळी सरदवाडी मर्गावरील उपनगरातील रहिवासी व पांगारवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.