गोरगरीबांना मायेची ऊब; ५००ब्लॅँकेट, ८० गोधड्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:38 PM2018-12-18T16:38:25+5:302018-12-18T16:39:43+5:30
शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
नाशिक : आठवडाभरापासून शहरात थंडीचा कडाका वाढला असून तापमान हे आठ अंशापर्यंत खाली घसरले आहे. यामुळे गोदाकाठावर राहणाऱ्या गोरगरीबांना अधिक त्रास सोसावा लागत आहे. उघड्यावर जीवन जगणाºयांना उबदार कपड्यांचे संरक्षण देत सामजिक संवदेना जागृत ठेवण्याचा संदेश मानव उत्थान मंचच्या युवा स्वयंसेवकांनी दिला.
शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर बसस्थानकासह शहरातील सातपूर, पंचवटी अमरधाम, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मैदान, रोकडोबा मैदान, गौरी पटांगण, रामकुंड आदि भागात उघड्यावर जीवन जगणाºया गोरगरीबांना सुमारे ५०० ब्लॅँकेट, ८० गोधड्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी मंचाकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजातील दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काही नागरिकांनी रोख रक्कम तर काहींनी जुने कपडयांच्या स्वरुपात या स्वयंसेवी संस्थेच्या ‘बिइंग सांता’ या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. यामुळे १ लाख दहा हजारांचा निधी उभारण्यास यश आले. संकलित करण्यात आलेल्या जुन्या कपड्यांपासून गोधड्या तयार करण्यात आल्या. गरजू निराधारांना कुपनद्वारे या गोधड्या व ब्लॅँकेटचे वाटप करण्यात आले. सातत्याने विविध सामाजिक संकल्पनांद्वारे या संस्थेचा युवा स्वयंसेवी वर्ग उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपुर्वीच दिपावलीच्या पार्श्वभूमीवर हातावरील कामगारांना दिवाळी ‘फराळ टिफीन’ भेट म्हणून वाटण्यात आले होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून अशाच पध्दतीचा उपक्रम राबविला जात आहे. दिवसेंदिवस हा उपक्रम व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे उपक्रम समन्वयक जसमीत सहेमी यांनी सांगितली.
कुलूपबंद निवाराशेड उघडण्यासाठी आंदोलन
शहरातील गोदाकाठालगत बेघर गोरगरीबांना हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षणासाठी महापालिकेने उभारलेले निवारागृहे कुलूपबंद अवस्थेत आहे. ही निवारागृहे तातडीने उघडून स्वच्छता करुन संबंधितांना उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे जगबिर सिंह यांनी सांगितले. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.