भाजपा पुन्हा स्वबळावर

By admin | Published: January 17, 2017 11:49 PM2017-01-17T23:49:19+5:302017-01-17T23:49:39+5:30

युती नाहीच : शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा

BJP again on self rule | भाजपा पुन्हा स्वबळावर

भाजपा पुन्हा स्वबळावर

Next

नाशिक : राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा - सेनेत युती करण्यासाठी प्रदेश पातळीवर हालचाली सुरू असताना नाशिकमध्ये मात्र भाजपा स्वबळावरच लढणार आहे. शिवसेनेकडून प्रस्तावही येत नाही आणि प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगत भाजपाने शिवसेनेवर खापर फोडले आहेत.  नाशिक महापालिकेत गेल्यावेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली नव्हती. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपा आणि सेनेचे संख्याबळ एकत्र आले तरी महापौर होणार नव्हता. त्याचदरम्यान भाजपाने सर्वाधिक संख्या असलेल्या मनसेला पाठिंबा दिला आणि त्यानंतर मनसेबरोबरच अडीच वर्ष काढले. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्याने या निवडणुका युतीने लढायची तयारी झाल्याने भाजपाने मनसेला पुन्हा पाठिंबा न देता शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात मात्र अशा घडामोडी घडल्या की विधानसभा निवडणुकीत युती झालीच नाही.  भाजपा-सेनेची स्थानिक पातळीवर झालेली युती मात्र कायम असताना आता मात्र भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. भाजपाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतीप्रसंगी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी महापलिका निवडणूक स्वंतत्र्यरीत्या लढणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्यावेळी भाजपाने स्वतंत्र्यरीत्या स्वबळावरच निवडणूक लढविली होती. त्यानंतर युती झाली असली तरी महापालिकेच्या नाशिकरोड विभागात झालेल्या दोन पोटनिवडणुकींच्या वेळी शिवसेनेला युती करण्यासाठी आग्रह केल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
आताही शिवसेनेकडून प्रतिसाद आणि प्रस्ताव मिळत नाही. त्यातच भाजपाकडे ३१ प्रभागांसाठी सातशे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, अशा स्थितीत स्वबळावर निवडणुका लढविण्यात याव्यात यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याने भाजपा स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सानप यांनी सांगितले. यावेळी संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे तसेच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: BJP again on self rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.