भाजप, सेना ताट-वाट्या घेऊन राज्यभर फिरताहेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 02:04 AM2019-10-17T02:04:22+5:302019-10-17T02:04:58+5:30
महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.
नाशिक : महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात शिवसेनेवर तुटून पडताना राज ठाकरे यांनी भाजपाने जागावाटपात नाशिक व पुण्यात शिवसेनेला एकही जागा न सोडल्याचा संदर्भ दिला तसेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून देताना ते म्हणाले, यापुढे महाराष्टÑावर एक हाती भगवा फडकावयाचा असून, गेली २५ वर्षे भाजपाबरोबर युती करून सडली, असे म्हणणाºया उद्धव ठाकरेंना नाशिक व पुण्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपाने एकही जागा न सोडल्याने शिवसेनेच्या लोकांनी काय करायचे? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
सत्तेसाठी शिवसेना भाजपाच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
पंतप्रधानांनी नोटबंदी केल्यानंतर आपण हा निर्णय जर चुकला तर देश खड्ड्यात जाईल, असे भाकीत केले होते, तसेच घडले असून, नोटबंदीनंतर रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावा लागला, देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालवत चालली.
नाशिकचा पराभव जिव्हारी लागला...
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे केली. मात्र तरीही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कधी कधी काय पाहिजे हेच कळत नाही. काम करून सत्ता मिळत नाही आणि जे काहीच करत नाही त्यांना मात्र भरभरून दिले जाते. त्यामुळे नाशिकचा पराभव जिव्हारी लागला, असे राज ठाकरे यांनी सांगतानाच आपली खंत जाहीर सभेत केली.
च्नाशिककरांवर बोजा नको म्हणून बाहेरून निधी आणला आणि कामे केली. टाटा किंवा अन्य कोणी अन्य शहरात जाऊन कामे केली आहेत का, असा प्रश्न करीत त्यांनी तरीही आपले नाशिकवरचे प्रेम कमी झाले नाही, असे नमूद केले. नाशिक महापालिकेत आपण कामे केली, इतकी कामे गेल्या तीस वर्षांत झाली नाही, मात्र आता काय सुरू आहे. महापालिका ओरबाडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
किती काश्मिरी पंडित परतले?
निवडणुकीच्या प्रचारात पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काय कामे केली, हे सांगत नाही. जनतेचे भलत्याच प्रश्नाकडे लक्ष वळविले जात असून, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा व महाराष्टÑाच्या निवडणूक प्रचाराशी त्याचा काय संबंध? हा प्रश्न काश्मीरपुरता मर्यादित असून, ३७० रद्द केल्यानंतर सरकारने काश्मीरमध्ये काय केले? किती काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परत आले याचा आकडा भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर करावा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.