भाजपा शहराध्यक्षपदी पालवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:40 AM2019-08-20T01:40:53+5:302019-08-20T01:41:14+5:30
शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
नाशिक : शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
पालवे हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांनी २००७ मध्ये युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर २०११ मध्ये युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितले आहे. त्यानंतर सध्याचे मावळते शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीत ते उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांना प्रथमच शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारी (दि.२०) मावळते अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याकडून ते सूत्र स्वीकारतील. विधानसभेच्या तोंडावर भाजपाने शहराध्यक्षपदाचा शोध सुरू केला होता.
मावळते अध्यक्ष बाळासाहेब सानप यांना पदमुक्त करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्यांची मुदत गेल्यावर्षी संपलीच होती. त्यानंतर भाजपाने आमदार आणि शहराध्यक्ष अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी एकाच व्यक्तीकडे न देण्याचा निर्णय घेतला तरी मध्यंतरी लोकसभा निवडणुकांमुळे हा विषय टळला. त्यानंतर अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यात माजी अध्यक्ष विजय साने, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, सुनील केदार, उत्तमराव उगले, अनिल भालेराव, पवन भगूरकर, प्रशांत जाधव, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे अशा अनेकांची नावे चर्चेत असले तरी नवा चेहराच देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता.
अनेक इच्छुक नाराज
भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी अनेक दावेदार होते. त्यापैकी अनेक जण नव्या दमाचे परंतु पालवे यांच्यापेक्षा जास्त काळ भाजपात काम करणारे अनेक निष्ठावान होते. मात्र प्रस्थापितांच्या गटातून आणि आर्थिक सुबत्तेच्या निकषावर हा निर्णय झाला अशा प्रकारच्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या.