मनपा निवडणुकीतील गटबाजी प्रकरणी भाजपाने मागवला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:16+5:302021-07-21T04:12:16+5:30
नाशिक- तीन दिवस नाशिकमध्ये थांबून भक्कम तटबंदी उभारल्याच्या विश्वासाने जाणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची पाठ फिरताच नाशिक रोड ...
नाशिक- तीन दिवस नाशिकमध्ये थांबून भक्कम तटबंदी उभारल्याच्या विश्वासाने जाणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची पाठ फिरताच नाशिक रोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत झालेल्या गटबाजीमुळे पाटील यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी याप्रकरणी तातडीने अहवाल मागवल्याचे वृत्त असून त्यात सानप यांच्यावर ठपका ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणुकीत गैरहजर राहिल्याप्रकरणी डॉ. सीमा ताजणे आणि विशाल संगमनेरे यांना कारणे दाखवा नेाटीस बजावण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापून ॲड. राहुल ढिकले यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पक्ष सोडून गेलेले सानप पुन्हा पक्षात आल्यानंतर आता सानप आणि ॲड. ढिकले यांच्यातील गटबाजी वाढली आहे. त्यात प्रभाग समितीच्या निवडणुकीत गटबाजी उफाळून आली. मीरा हांडगे यांना उमेदवारी दिल्यानंतर सानप गटात मतदान कितपत करेल याविषयी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नाराजांना निवडणुकीस उपस्थित राहून पक्ष उमेदवाराला मतदान देण्याची जबाबदारी सानप यांनाच देण्यात आली होती. त्यानुसार सानप यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या गोटातील मानले जाणारे कोमल मेहरोलीया, सुमन सातभाई हे सर्वच आले. मात्र, डॉ. सीमा ताजणे आणि विशाल संगमनेरे हे दोघेही निवडणुकीत सहभागी झाले नाही. डॉ. ताजणे या संपर्क क्षेत्राबाहेर असून त्या कोणाचेही फोन घेत नाहीत असे सानप यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे विशाल संगमनेरे हे मुंबईत होते, ते तेथून वेळेत येतो, असे सांगूनही आले नाही की ऑनलाइन निवडणुकीत केवळ मोबाइलने सहभागी झाले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या मीरा हांडगे यांना दोन मते कमी मिळाल्याने त्यांना पराभवाला सामाेरे जावे लागले.
एकेकाळी सानप यांच्या गटाचे मानले जात त्या गिरीश महाजन यांचे आता सानप यांच्याशी फारसे सख्य नाही. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गटबाजी मोडीत काढण्यासाठी प्रीतिभोजनाची खेळी करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनाही हा विषय जिव्हारी लागल्याचे समजते. यासंदर्भात त्यांनी अहवाल मागवला असून त्यात सानप यांच्यावर ठपका ठेवल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी आपल्याकडे असा अहवाल मागवला नव्हता. आणि आपण तो दिलाही नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, डॉ. ताजणे आणि संगमनेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इन्फो...
पक्षादेशाचा गेालमाल
निवडणुकीत समसमान मतदान होऊ शकते हे माहिती असूनही भाजपने नगरसेवकांना पक्षादेशच (व्हीप) बजावला नसल्याचे उघड झाले होते. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी त्यास दुजोरा दिला होता. मात्र, आता पक्षाने घुमजाव केले असून गटनेता अरुण पवार यांनी सर्वांना व्हॅट्स ॲपवर पक्षादेश बजावला होता, असा दावा केला आहे. यासंदर्भात गैरसमज झाला होता, असे पालवे यांनी सांगितले.
इन्फो...
पालवे म्हणतात सकारात्मकतेने बघा..
नाशिक रोड येथील प्रकरणावरून भाजपाच्या पराभवाची चर्चा होत असली तरी सहापैकी तीन प्रभाग भाजपने जिंकले आहेत. म्हणजेच सातपूर प्रभागात मनसे पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे. ही बाब सकारात्मकतेने बघावी, असे मत भाजपाच्या शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी व्यक्त केले आहे. नाशिक राेड येथे समसमान मते पडली असती आणि सोडत काढली असती तरीही त्यात पक्षाने बाजी मारली असती, असेही त्यांनी नमूद केले आहे.