भाजपतर्फे फरांदे, हिरे यांना उमेदवारी; सानप अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:06 AM2019-10-02T01:06:50+5:302019-10-02T01:07:26+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत, तर ग्रामीण भागात एक आमदार आहे. सर्वच मतदारसंघात भाजपकडूनच मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असल्याने या मतदारसंघांबाबत उत्कंठा होती. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या वतीने माजी आमदारासह अन्य अनेक जण इच्छुक होते, तर नाशिक पश्चिममध्ये अशीच अवस्था होती. या मतदारसंघात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. बहुतांशी प्रबळ दावेदारांनी तर आमदारांशी संघर्ष सुरू केला होता. त्यामुळे भाजपत तर गटबाजी वाढली होती. त्यातून आरोप- प्रत्यारोपदेखील झडत होते.
सर्वाधिक प्रबळ दावेदारी नाशिक पूर्व मतदारसंघात असून, तेथील अनेकजण लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधात वातावरण पेटले आहे. सानप यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अन्य इच्छुकांनी सोमवारी (दि.३०) मेळावा घेतला. इतकेच नव्हे तर त्यानंतर मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही गट ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर करू आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असे जाहीर केले. मंगळवारी (दि.१) पक्षाच्या वतीने भाजपच्या वतीने १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात नाशिक पूर्वमधून कोणालाही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही.