भाजपचा उमेदवार आज निश्चित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:44 AM2019-11-19T01:44:02+5:302019-11-19T01:44:31+5:30

नाशिक : महापौरपदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आल्याने भाजपमध्ये धावपळ सुरू असून, उमेदवार घोषित केल्याशिवाय गणिते जमविणे कठीण असल्याने ...

 BJP candidate will be decided today | भाजपचा उमेदवार आज निश्चित होणार

भाजपचा उमेदवार आज निश्चित होणार

Next

नाशिक : महापौरपदाचीनिवडणूक अवघ्या चार दिवसांवर आल्याने भाजपमध्ये धावपळ सुरू असून, उमेदवार घोषित केल्याशिवाय गणिते जमविणे कठीण असल्याने पक्षाने तशी तयारी सुरू केली आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्ट संघटनमंत्री किशोर काळकर हे मंगळवारी (दि.१९) कोकणात सहलीवर असलेल्या नगरसेवकांची मते अजमावणार असून, त्याचवेळी उमेदवार घोषित करणार असल्याची माहिती गटनेता जगदीश पाटील यांनी दिली. दरम्यान, भाजपच्या संपर्काबाहेर सात-आठ नव्हे तर अनेक नगरसेवक होते. त्यातील तीन जण भाजपच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. तर आठ जणांचा संपर्क नसला तरी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे अन्य पक्षांशी बोलणी करण्याची जबाबदारी भाजपच्या आमदारांंना देण्यात आली आहे.
भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या पक्षात प्रचंड स्पर्धा असून, त्यामुळे पक्षाला उमेदवार ठरविणे जिकिरीचे झाले आहे. पक्षातील मूळ नगरसेवकांना देण्याची मागणीदेखील पुढे रेटली जात असून, अशावेळी पक्षातील ज्येष्ठत्व की निवडणूक आणि सभागृह संचलन करण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षातील इच्छुकांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे भेटी-गाठी घेणे सुरूच ठेवले असून, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर तसेच अरुण पवार यांनी मुंबईत गाठीभेटी घेतल्याचे वृत्त आहे.
तर दिनकर पाटील यांनी विरोधी पक्षांतील अनेकांशी संधान जुळवून व्यूहरचना सुरू केली आहे. पक्षात अनेक इच्छुक नगरसेवक सेवक असून, त्यात शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, सतीशनाना कुलकर्णी, संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक असून, उपमहापौरपदासाठीदेखील कमलेश बोडके, गणेश गिते, संगीता गायकवाड, प्रा. शरद मोरे, प्रियांका घाटे असे अनेक जण इच्छुक आहेत. त्यात माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांची सर्वाधिक बळकट दावेदारी मानली जात आहे.
प्रभागात चार नगरसेवक निवडून आणतानाच पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांच्या यशात मोलाचा वाटा त्यांचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तयार असलेल्या पाटील यांना पक्षाच्या नेत्यांनी थांबवून महापौरपदाचा शब्द दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर महापालिकेत बहुमत असतानाही फाटाफुटीच्या शक्यतेमुळे त्यांच्यावरून शक्यतेमुळे परिस्थिती हाताळण्यासाठीदेखील पक्षाला सक्षम उमेदवाराची गरज आहे त्यामुळेच पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. मंगळवारी (दि.१९) माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर हे सिंधुदुर्गमध्ये सहलीवर असलेल्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची मते अजमावणार आहेत. त्यानंतर पक्षाचे उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, प्रियांका माने, पूनम धनगर, सुमन सातभाई, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सुनीता पिंगळे हे गटनेत्यांच्या संपर्काबाहेर आहेत. त्यातील काहीजण मोबाइल उचलत नाही, असे गटनेते पाटील यांनी सांगितल्यामुळे संबंधितांशी प्रत्यक्ष भेटून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपच्या गोटात आता ५१ नगरसेवक
पक्षाच्या सहलीत नसलेले आणि अन्यत्र असलेले भगवान दोंदे, राकेश दोंदे, पुंडलिक खोडे हे सोमवारी (दि.१८) पक्ष नेत्यांशी चर्चा करून कॅम्पमध्ये रवाना झाले. आता पक्षाच्या सहलीच्या ठिकाणी एकूण ५१ नगरसेवक भाजपच्या कॅम्पमध्ये आहेत.
भाजपचे नगरसेवक कोकणातील देवगढमध्ये असून, हा नीतेश राणे यांचा मतदारसंघ आहे. नगरसेवकांत फाटाफूट होऊ नये यासाठी संबंधितांना खास राणे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आले आहे. सोमवारी (दि. १८) या नगरसेवकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी देवदर्शन केले. या नगरसेवकांना आता गोव्याला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
 

Web Title:  BJP candidate will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.