मतदारांतील उदासीनतेचा भाजप उमेदवाराला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:48 AM2019-05-24T00:48:52+5:302019-05-24T00:49:25+5:30
नरेंद्र मोदींच्या लाटेचा फायदा विद्यमान खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनाही झाला.
नरेंद्र मोदींच्या लाटेचा फायदा विद्यमान खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनाही झाला. मालेगाव मध्य मतदारसंघातील मतदारांमध्ये असलेल्या उदासीनतेमुळे अत्यंत कमी मतदान झाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगाव मध्य मतदारसंघात केलेला प्रचार आणि आखलेली व्यूहरचनेचा त्यांना फायदा झाला. परंपरागत कॉँग्रेसचा मतदार असलेल्या मुस्लीम मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने त्याचा भाजपला फायदा झाला.
भाजप आणि कॉँग्रेसचे दोन्ही प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार स्थानिक नसल्याने त्यांच्या विषयी मुस्लीम मतदारांत फारसे औत्सुक्य नव्हते; मात्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्याविषयी मुस्लीम मतदारांत काही प्रमाणात अनुकूल मत होते. वंचित आघाडीने नबी अहमद यांना धुळे लोकसभा मतदारसंघात ज्या अपेक्षेने मैदानात उतरविले होते, त्यात त्यांचा अपेक्षाभंग झाला असेच म्हणावे लागेल. कारण मुस्लीम आणि दलित मते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खेचली जातील ही त्याची अपेक्षा फोल ठरली. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांनाही फारशी मते मिळू शकली नाहीत. भाजप उमेदवाराच्या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. कारण मालेगाव हा सेनेचा बालेकिल्ला असून, सेना- भाजप युतीचा त्यांच्या विजयात मोठा वाटा आहे. मनसेच्या राज ठाकरे यांच्या मोदी-शाह यांच्या विरोधातील घेतलेल्या सभांचा फायदा कॉँग्रेसला मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली. काँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल या दोघांची काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारातील उदासीनतेचाही काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना फटका बसला, तर भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना फायदा झाला.
या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असली तरी त्याचा मालेगाव मध्य मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम पडणार नाही. कारण मालेगाव मध्य मतदारसंघात बहुसंख्य मुस्लीम मतदार असून, हा मतदार नेहमी कॉँग्रेसबरोबर राहिला आहे. त्यापूर्वी बराच काळ जनता दलाचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपचा खासदार निवडून आला असला तरी विधानसभेसाठी विद्यमान आमदार आसिफ शेख आणि माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल या परंपरागत राजकीय विरोधकातच लढत रंगणार आहे.