उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला
By संकेत शुक्ला | Published: May 18, 2024 04:38 PM2024-05-18T16:38:18+5:302024-05-18T16:39:04+5:30
नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
संकेत शुक्ल, नाशिक :उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यामुळे ते काहीही बडबड करीत आहेत. अन्यथा भगव्या ध्वजाबाबत त्यांनी असे उद्गार काढले नसते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला. नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, चोरांचे सरदार कोण आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.
राज्यासह मुंबई मनपा लुटण्याचा प्रकार ठाकरे यांनी केल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे विकास झाला. मात्र, ठाकरे यांना तो दिसत नाही. उद्धव यांनी हिंदुत्व सोडले नसते, काँग्रेस सोबत गेले नसते तर ते फस्ट्रेट झाले नसते. भगव्या ध्वजाबाबत त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या पराभूत मानसिकतेचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे आडनावाला वलय आहे. परंतु राज ठाकरे यांना बाहेर काढण्यात आले. उद्धव यांनीच त्यांना बाजूला केले. राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन देण्याचा निर्णय योग्य आहे. पंतप्रधान मोदी राज यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे. शरद पवार यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पवारांचा पक्ष बारामतीतही हरतो आहे. त्यामुळे त्यांना उतारवयात गल्लोगल्ली फिरावे लागते आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.