भाजपा शहराध्यक्ष बदल निश्चित; अनेक नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:13 AM2019-07-01T01:13:06+5:302019-07-01T01:13:23+5:30
एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा झाल्याचेही समजते.
नाशिक : एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा झाल्याचेही समजते. दरम्यान, विधानसभेसाठी इच्छुकांचा शहराध्यक्ष पदासाठी विचार होणार नसल्याने यासंदर्भात अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार असल्याचे समजते.
नाशिक शहराध्यक्ष बदलाबाबत ज्यांना विधानसभा निवडणुका लढवायचे आहे त्यांना इतर जबाबदारी देऊ नये, असा पक्षाचा निर्णय असून एक व्यक्ती एक पद असे धोरण पक्षाचे आहे. त्यामुळे नाशिकसाठी वेगळा निर्णय होणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात संबंधितांची जनमानसात असलेली प्रतिमा, त्यांचे काम विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
शहरातील भाजपा शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चेने इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली असून, प्रत्येक जण आपापल्या परीने लॉबिंग करीत असताना माजी शहराध्यक्ष विजय साने यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, त्यादृष्टीने शहराध्यक्षपदाविषयी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले असता बहुतांश पदाधिकाऱ्यांनी नवीन चेहºयांना संधी देण्याची मागणी केल्याचे वृत्त असून, यात विजय साने यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने नाशिकचा शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत आपली नावे पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र अर्धा डझनहून अधिक नेत्यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा पेलण्याची इच्छा दर्शविली असून, त्यांची नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सुनील केदार, नगरसेवक मुन्ना हिरे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी उत्तम उगले आदी नावे चर्चेत आहेत.
महानगरपालिकेत पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असताना दिनकर पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेत महापालिकेत ठिय्या ठोकण्याचे केलेले वर्तन निश्चितच चुकीचे असून, त्यांच्या भूमिकेचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.