महापौर निवडणुकीत फाटाफूट होण्याची भीती, भाजपाचे नगरसेवक सहलीसाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:46 PM2019-11-16T16:46:40+5:302019-11-16T16:47:07+5:30
नाशिकच्या महापौरपदाची निवडणुक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे.
नाशिक : बहुमत असताना नाशिक महापालिकेत भाजपाला महापौर पदाच्या निवडणुकीत महाशिवआघाडी आव्हान देण्याची तयारी करीत असल्याने भाजपाच्या बहुतांशी नगरसेवकांना शनिवारी सहलीसाठी पाठवण्यात आले आहे.
नाशिकच्या महापौरपदाची निवडणुक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे. महापालिकेत सध्या 65 नगरसेवक असल्याने भाजपाचे बहुमत आहे. मात्र, राज्यातील नव्या सत्ता समीकरणाप्रमाणे शिवसेनेचे 34, काँग्रेस- राष्ट्रवादीचे 12, मनसेचे 5, अपक्ष 3 आणि रिपाई आठवले गटाचा 1 असे सर्व एकत्र झाल्यास 55 अशी संख्या होते. त्यामुळे भाजपाचे सहा नगरसेवक फुटल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे भाजपाने दखल घेत आज सर्व नगरसेवकांना सहलीला पाठविले आहे. मात्र, 7 नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास नकार दिल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहे.
हे सर्व जण अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे सानप सध्या शिवसेनेत आहेत आणि नाशिक महापालिकेत महाशिवआघाडी तयार करण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे.