भाजपा नगरसेवकांना ध्वनिफीत भोवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:33 AM2017-09-23T00:33:23+5:302017-09-23T00:33:28+5:30
गेल्या बुधवारी (दि. २०) झालेल्या महापालिकेच्या महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनिफीत शिवसेनेकडून संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकविली जाणार असून, फलकही झळकवणार आहेत. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत मागविली असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाशिक : गेल्या बुधवारी (दि. २०) झालेल्या महापालिकेच्या महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनिफीत शिवसेनेकडून संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकविली जाणार असून, फलकही झळकवणार आहेत. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत मागविली असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र, सेनेला काउंटर करण्यासाठी लगोलग भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही लक्षवेधी सादर करत शहरात साथरोगाचा प्रभाग गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सात तास चाललेल्या महासभेत शिवसेना प्रशासनावर तुटून पडली असताना भाजपाचे एकेक नगरसेवक प्रशासनातील अधिकाºयांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसोद्गार काढत होते. अधिकाºयांना दूरध्वनी केल्यानंतर ते कसे पाच मिनिटांत हजर झाले, असे प्रसंगही रंगवून सांगितले गेले. काही भाजपा नगरसेवकांनी अस्वच्छतेला प्रशासन नव्हे तर नागरीकच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. आता शिवसेनेने नागरिकांवर प्रहार करणाºया भाजपा नगरसेवकांची ध्वनीफीतच नगरसचिव विभागाकडे मागितली असून, त्या-त्या नगरसेवकाने केलेल्या भाषणाची ध्वनीफीत त्यांच्या प्रभागात ऐकविली जाणार आहे तसेच प्रभागांमध्ये जाहीररीत्या फलकही झळकवले जाणार आहेत. त्यामुळे भाजपाचे खरे स्वरूप नागरिकांना समजणार असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.
ध्वनिफीत मिळण्याबाबत शंका
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी लेखीपत्र देऊन महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत नगरसचिव विभागाकडे मागितली आहे. परंतु, नगरसचिव विभागाकडून सदर ध्वनिफीत देण्याबाबत टाळाटाळ केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय सत्ताधारी भाजपाकडूनही सदर ध्वनिफीत सेनेच्या हातात जाऊ नये, याकरिता प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. सेनेला ध्वनिफीत उपलब्ध करून न दिल्यास पुन्हा भाजपाच टीकेची धनी होण्याची शक्यता आहे.