काँग्रेससमोर भाजपा, माकपाचे आव्हान

By admin | Published: February 16, 2017 11:00 PM2017-02-16T23:00:03+5:302017-02-16T23:00:17+5:30

चुरस : राष्ट्रवादीच्या साथीमुळे काँग्रेसचे हौसले बुलंद

BJP, CPI (M) 's challenge before Congress | काँग्रेससमोर भाजपा, माकपाचे आव्हान

काँग्रेससमोर भाजपा, माकपाचे आव्हान

Next

मनोज देवरे ल्ल कळवण
जिल्हा परिषदेच्या अभोणा गटाच्या मागील चार निवडणुका यशवंत गवळी या व्यक्तीच्या भोवताली फिरल्या असून, त्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने या गटात किंगमेकर म्हणूनच गवळी यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आणि उमेदवारी ही या गटात महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याने त्यांना भाजपाचे नवखा उमेदवार जितेंद्र ठाकरे यांच्या रूपाने आवाहन उभे केले आहे. भाजपाचा अनुभव घेऊन कॉँग्रेसमध्ये आलेल्या गवळींसमोर भाजपाचे तोकडे आवाहन समजले जात आहे. माकपाने विश्वनाथ थैल यांना उमेदवारी देऊन आपल्या हक्काच्या मतदारासमोर निशाणीचे चिन्ह केंद्रित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान होते; पण ते झिडकारत कॉँग्रेसने आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवून इतिहास घडविला होता. यंदा मात्र राष्ट्रवादीच्या दृष्टीने जणू बदला घेण्याचेच पोषक वातावरण तयार झाले असताना केवळ जागा अदालाबदलीच्या वाटपात काँग्रेसला राष्ट्रवादीचे समर्थन लाभल्याने कॉँग्रेसचे पुन्हा एकदा हौसले बुलंद झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अहिताचे समर्थन असले तरी तालुक्याच्या राजकारणाला अपेक्षित अन् पोषक ठरल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील मानूर, कनाशी व खर्डे दिगर गटावर होणार आहे. भाजपा व माकपाने उमेदवार उभे करून कॉँग्रेसला आव्हान दिले आहे.
सन १९९७, २००२, २००७ व २०१२ या चार पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभोणा गटात कॉँग्रेसचा बोलबाला राहिला असून, सन २००७ वगळता अन्य तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत यशवंत गवळी परिवारातील सदस्याने बाजी मारली आहे. विमलताई बागुल यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापतिपद व रवींद्र देवरे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापतिपद गटाला मिळाले आहे.
आघाडीचे बेरजेचे राजकारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वचपा काढण्यासाठी या गटात राष्ट्रवादी काँग्रेस सरसावणार असे राजकीय रंग निवडणुकीत दिले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार याच कडवे आव्हान देऊन या गटात सर्जिकल स्ट्राइक करतील, असे बोलले जात होते. काँग्रेसची परंपरा खंडित होईल, असा राजकीय अंदाज या बिगफाईटमध्ये होता.
मात्र माघारीच्या आदल्या दिवशी कळवण तालुक्यात जिल्हास्तरीय नेतृत्वाने धाव घेऊन समझोता एक्स्प्रेसने अभोण्यात थांबा घेतल्याने राष्ट्रवादीला अभोण्यात थांबावे लागल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, गट आणि गणात राष्ट्रवादीचे समर्थन कॉँग्रेसला लाभणार आहे तर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार कळवण तालुक्यात आघाडीचे बेरजेचे राजकारण खेळण्यास सुरुवात यानिमित्ताने झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागाशी संलग्न असल्याने या भागात सध्या शेतमालाचा बाजारभाव, कांदा, टमाटे व भाजीपाल्याचे घसरलेले बाजारभाव, नोटाबंदीचा शेतीव्यवसायावर झालेला परिणाम व ठप्प झालेले व्यवहार, पैसे असूनही बॅँकांकडे चलन उपलब्ध नसल्याने त्याचा दैनंदिन व्यवहारावर होणारा परिणाम याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल, असे शेतकरी आता उघड बोलू लागले आहेत. गटातील सर्व गावांमध्ये वैयक्तिक जनसंपर्क अन् उमेदवारांची असलेली पकडच मतपेटीतून स्पष्ट होणार असल्याने या गावांमध्ये सध्या भेटीगाठी अन प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला आहे.

Web Title: BJP, CPI (M) 's challenge before Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.