महासभेतील ठराव दडवादडवीवरून भाजपत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:28 AM2021-07-29T01:28:15+5:302021-07-29T01:29:01+5:30
महापालिकेत सत्तारूढ भाजपतील गटबाजी वाढत चालली असून, आता महासभेच्या ठराव रोखण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. महासभेतील ३७ ठराव सभागृह नेत्यांकडे असल्याचे कळल्यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी थेट कमलेश बोडके यांनी बेालावून साक्षीपुरावे काढले. बोडके यांनी त्याचा इन्कार केला आहे.त्यामुळे महापौर मात्र भूमिकेवर ठाम आहेत, त्यांनी प्रलंबित ठरावांची यादी पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.
नाशिक : महापालिकेत सत्तारूढ भाजपतील गटबाजी वाढत चालली असून, आता महासभेच्या ठराव रोखण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. महासभेतील ३७ ठराव सभागृह नेत्यांकडे असल्याचे कळल्यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी थेट कमलेश बोडके यांनी बेालावून साक्षीपुरावे काढले. बोडके यांनी त्याचा इन्कार केला आहे.त्यामुळे महापौर मात्र भूमिकेवर ठाम आहेत, त्यांनी प्रलंबित ठरावांची यादी पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.
महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षीय पातळीवर तयारी सुरू असताना नाशिक भाजपत जोरदार वादंग सुरू झाले आहे. प्रभाग समितीमध्ये फाटाफूट झाल्यानंतर निर्माण झालेला वाद शमत नाही तोच महापौरांनी महापालिकेच्या अंतिम अर्थसंकल्पात फेरबदल करून अनेक पदाधिकाऱ्यांचा निधी लाटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याचदरम्यान १९ जुलै रोजीर आयुक्त कैलास जाधव यांनी मार्च महिन्यापर्यंत आलेले अंदाजपत्रकच अंतिम राहील असे स्पष्ट केले.
दरम्यान, महापौर सतीश कुलकर्णी आणि सभापती गणेश गिते यांच्यात झालेल्या चर्चेतून सभागृह नेते कमलेश बोडके यांच्याकडे २७ ठराव प्रलंबित असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे गिते यांनी बोडके यांना आपल्या कक्षात बोलवून घेतल्यानंतर त्यांनी आपल्याकडे एकच ठराव शिल्लक आहे, उलट महापौरांकडे, प्रभाग समित्यांकडे दहा ठराव पडून असल्याचे सांगितले .त्यावर सभापतींनी महापौरांशी संपर्क साधल्यावर त्यांनी आपल्या विधानावर ठाम राहात सभागृह नेत्यांकडील प्रलंबित ठरावांची यादी पाठवतो असे स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवेदेखील उपस्थित होते.
इन्फो..
त्या दोन नगरसेवकांचे उत्तर नाहीच
नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत फाटाफूट झाल्यानंतर डॉ. सीमा ताजणे आणि विशाल संगमनेरे यांना भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन्ही नगरसेवकांनी अद्याप त्या पत्राला उत्तर दिलेले नाही.