भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:18 AM2021-08-26T04:18:22+5:302021-08-26T04:18:22+5:30

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत हिंदू समाजाच्या भावना ...

BJP demands to file a case directly against the Chief Minister | भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी प्रक्षोभक विधाने करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणाऱ्या युवासेना नेते वरुण देसाई यांनाही मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी आश्रय दिल्याने देसाई यांच्यासह मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश आहेर यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त प्रकरणात मंगळवारी नाशिकसह संपूर्ण राज्यभरात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतर शिवसेनेने बुधवारी (दि. २५) पुन्हा भाजपला डिवचत नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका करणाऱ्या सामनातील अग्रलेखांचे फलक शहरात झळकवले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात धरणे आंदोलन करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्या संपादकावर तसेच फलक लावणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यासाठी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी पोलिस आयुक्तालयात येऊन धरणे आंदोलन केले. दरम्यान, सामनातील अक्षेपार्ह लेखाविषयी संपादक रश्मी ठाकरे यांच्यासह लेखाची फलकबाजी करणारे अजय बोरस्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते शिवाजी निवृत्ती बरके यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

इन्फो-

भाजप - शिवसेना वाद विकोपाला जाण्याचे संकेत

नाशिकमध्ये मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दिवसभर रंगलेल्या अटकनाट्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आवारात धरणे आंदोलन करीत सामानातील नारायण राणे यांच्यावर टीकात्मक लेखाविषयी संपादक रश्मी ठाकरे यांच्यावर तसेच योगी आदित्यनाथ यांच्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आमने-सामने आलेल्या भाजप- शिवसेनेमधील वाद आणखीनच विकोपाला जाण्याचे संकेत आहे.

Web Title: BJP demands to file a case directly against the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.