भाजपने शब्द न पाळल्याने मनपावर भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:10+5:302021-03-19T04:15:10+5:30
नाशिक : जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेतृत्वाने जळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला नाही. ...
नाशिक : जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेतृत्वाने जळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करून महापालिकेवर भगवा फडकविला, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
नाशिकमधील कोरोना आढावा बैठकीसाठी आलेले दादा भुसे यांनी जळगावमधील सेनेच्या विजयावर आपली भूमिका स्पष्ट करताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली. भाजपने जळगावकरांना विकासाचे स्वप्न दाखविले, विकासाचा शब्द दिला, मात्र शब्द न पाळल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याने महापालिकेवर भगवा फडकला, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जळगावातील भाजप नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली. जळगाव महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा फडकला. गुलाबराव पाटील यांची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण राहिली, असेही भुसे यांनी सांगितले.
जळगावमधील सत्तांतराचे श्रेय हे शिवसेनेला आहेच, पर्यायाने महाविकास आघाडीलादेखील असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.