नाशिककरांना विस्थापित करण्याचा भाजपाचा डाव
By admin | Published: February 18, 2017 12:48 AM2017-02-18T00:48:07+5:302017-02-18T00:48:22+5:30
राज ठाकरे यांचा आरोप : सेना-भाजपाच्या गुन्हेगारीकरणावर घणाघात
नाशिक : बहुचर्चित शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या लपवाछपवीच्या मुद्द्याला हात घालत नाशिककरांना विस्थापित करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या जाहीर सभेत बोलताना केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेली नियमावली खोटी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे आव्हानही त्यानी दिले. सेना-भाजपाच्या गुन्हेगारीकरणावरही घणाघात घालत भ्रष्टाचारी व गुंडांच्या हाती नाशिक सोपविणार काय, असा सवाल त्यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने, भाजपावर हल्लाबोल केला. नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात भेडसावणाऱ्या शहर विकास नियंंत्रण नियमावलीचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी सांगितले, शहर विकास नियमावली तयार आहे, परंतु ती प्रकाशित केली जात नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात नऊ मीटरच्या रस्त्यांवरील घरांना वाढीव टीडीआर मिळणार नाही. नाशिककरांना पुनर्विकास करायचा असेल तर जागा विकाव्या लागतील आणि नाशिकबाहेर जावे लागेल. त्यामुळे निम्म्याहून नाशिक विस्थापित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर नियमावली खोटी आहे आणि ती रद्द होईल, असे जाहीर करावे, असे आव्हानही राज यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. भाजपावर टीका करताना राज म्हणाले, भाजपा हा थापा मारणारा पक्ष आहे. स्वीस बॅँकेतून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, परंतु निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ थापा मारल्या जातात. कुणी मेट्रो, विमानतळ आणण्याची भाषा करत आहेत. परंतु आधी विमान आणा. ते काही उतरत नाही. १९५२ मध्ये जन्माला आलेल्या भाजपाला अजूनही स्वत:चे उमेदवार मिळत नाही. पैसे देऊन माणसं फोडायची. पुणे शहरात तर बिल्डरांनी उमेदवार ठरविले, असा आरोपही राज यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकने ११०० कोटी मागितले होते. नाशिकपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या उज्जैनच्या कुंभमेळ्याला २२०० कोटी दिले, परंतु नाशिकला केवळ ७०० कोटी रुपये मिळाले. महापालिकेला ४०० कोटी रुपये उभे करावे लागले. केंद्र सरकारचा हा दुजाभाव असल्याचेही राज यांनी सांगितले. पाच वर्षांच्या मनसेच्या सत्ताकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. या शहरात आणखीही खूप काही आणू शकतो. पुढील पाच वर्षांत दुपटीने नाशिकचा विकास होईल. टक्केवारीसाठी नाशिकमध्ये आलेलो नाही. पक्ष चालवायला पैसे लागतात, परंतु लोकांना ओरबाडून पैसे काढत नाही. पंचवीस वर्षांत अन्य पक्षांनी कोणती कामे केली ते दाखवावे आणि मी पाच वर्षांत कोणती कामे केली, हे सांगतो, असे आव्हानही राज यांनी दिले. दरम्यान, मनसेच्या ‘माझा शब्द’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, शहराध्यक्ष राहुल ढिकले, डॉ. प्रदीप पवार उपस्थित होते.
नाशिकच्या विकासकामांचे सादरीकरण
राज यांनी व्यासपीठावरील स्क्रीनद्वारे शहरात पाच वर्षांच्या कारकिर्दीत घडविलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले. त्यात रस्ते, बॉटनिकल गार्डन, वॉटर कर्टन, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, गोदापार्क, शहर सुशोभिकरण, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण याचा धावता आढावा त्यांनी घेतला. यापुढे फाळके स्मारक बघायला आख्खे बॉलिवूड येईल, अशी रचना करण्यात येणार असल्याचेही राज यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची नक्कल
राज यांनी मागील निवडणुकीत छगन भुजबळ यांची नक्कल करत लक्ष वेधले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपाकुमार थापाडे अशी उपाधी दिली. थापेबाज मुख्यमंत्री अशी संभावना करत राज यांनी भाजपाने मुंबईत फडणवीसांच्या नावाने झळकविलेल्या फलकांवरही टीका केली. मनसेचा ‘माझा शब्द’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना राज म्हणाले, जो स्वत:च्या जिवावर खुर्चीवर बसलेला असतो, तो शब्द देत असतो. बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. मात्र मी जो शब्द देतो तो खरा असतो, असेही राज यांनी सांगितले.
जे गेले ते मेले
राज यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचाही समाचार घेतला. जे गेले ते एकटे गेले. भाजपाने पैशांच्या गोण्या ओतल्या आणि हे वास काढत गेले. जे गेले ते आपल्यासाठी मेले, असेही राज यांनी यावेळी सांगितले. राज यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने, शिवसेनेपेक्षा भाजपालाच अधिक लक्ष्य केले. गुरुवारी (दि.१६) झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत मनसेला सॉफ्टकॉर्नर देण्यात आला होता.