चांदवड पंचायत समितीत भाजपला सभापतिपद निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:46 PM2019-12-23T23:46:26+5:302019-12-23T23:47:46+5:30
चांदवड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे निघाले असून, येथे भाजपच्या मंगरूळ पंचायत समिती गणाच्या सदस्य पुष्पा विजय धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.
चांदवड : पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे निघाले असून, येथे भाजपच्या मंगरूळ पंचायत समिती गणाच्या सदस्य पुष्पा विजय धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.
सध्या राष्टÑवादी कॉँग्रेसचे विद्यमान सभापती अमोल भालेराव हे सभापती असून, उपसभापतिपदी शिवसेनेच्या ज्योती भवर आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा भाजप व राष्टÑवादी, कॉँग्रेस अशी युती झाली होती. त्यावेळी भाजपचे नितीन गांगुर्डे सभापती, तर उपसभापतिपदी अमोल भालेराव यांची निवड करण्यात आली. त्यावेळीच गांगुर्डे व भालेराव यांच्या दीड -दीड वर्षाचे आवर्तन ठरले होते.
सभापती व उपसभापती निवडणूक होऊन त्यात राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेना यांची आगळीवेगळी युती झाली. यावेळी सभापतिपदी राष्टÑवादीचे अमोल भालेराव व उपसभापती शिवसेनेच्या ज्योती भवर यांची निवड झाली. राजकीय हालचालीमुळे भाजप सत्तेपासून दुर होती. आता पुन्हा चांदवड पंचायत समितीचे आरक्षण अनूसूचित जाती असे जाहीर झाल्याने हे पद आपल्याकडेच निश्चित असल्याने भाजपच्या आशा पल्लवीत
झाल्या आहेत. पुढील अडीच वर्षांसाठी भाजपच्या मंगरुळ गणाच्या पंचायत समिती सदस्य पुष्पा विजय धाकराव या सभापती होतील, असे चित्र सध्या चांदवड पंचायत समितीत आहे.