भाजपा प्रवेश निष्फळ : अनेकांची अन्य प्रभागात दावेदारी

By admin | Published: January 19, 2017 12:18 AM2017-01-19T00:18:23+5:302017-01-19T00:18:40+5:30

पवन पवार यांची मुलाखतीलाच दांडी

BJP entry failless: Many claimants in other divisions | भाजपा प्रवेश निष्फळ : अनेकांची अन्य प्रभागात दावेदारी

भाजपा प्रवेश निष्फळ : अनेकांची अन्य प्रभागात दावेदारी

Next

नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवार याच्या संभाव्य उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मुलाखतीच्या वेळी पवार याने वसंत स्मृतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पवार याचा भाजपा प्रवेश या अर्थाने निष्फळ ठरल्याचे दिसत आहे.  भाजपा कार्यालयात मंगळवारपासून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी दहा प्रभागांसाठी सुमारे अडीचशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी ११ ते २० या प्रभागांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रभाग क्रमांक १८ मध्ये पवन पवार मुलाखतीला येणार काय, याकडे लक्ष लागून होते. परंतु प्रत्यक्षात मात्र, पवारने पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर पवार याच्या बंधूला भाजपा उमेदवार करणार असल्याची चर्चा होती, परंतु तोही फिरकला नाही. गेल्या वर्षी नाशिकरोड येथील दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी अपक्ष नगरसेवक पवन पवार याने भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपावर टीकेची झोड उठली होती.  भाजपाने त्यांच्या प्रवेशाचे समर्थन केले असले तरी सत्तेसाठी भाजपाने अशाप्रकारच्या मार्गाचा अवलंब केल्याने हा विषय राज्यस्तरावर गेला होता. केवळ पवारच नव्हे तर अन्य पक्षांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांसाठी भाजपाने पायघड्या घातल्याने हा टीकेचा विषय ठरला होता. पंचवटीतील अशाच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांनी मंगळवारी मुलाखती दिल्या. परंतु त्याचवेळी बुधवारी पवार याने मात्र भाजपा कार्यालयात येणे टाळले. अलीकडेच भाजपाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी पवन पवार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अन्य कोणालाही उमेदवारी पक्ष देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पवार याने भाजपा कार्यालयाकडे पाठ फिरवली.  अर्थात, अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ज्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या त्याबाबत भाजपा काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP entry failless: Many claimants in other divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.