नाशिकमध्ये भाजपा विस्तारक करणार आता दुचाकीवरून पक्षाचा विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:39 PM2018-01-02T21:39:23+5:302018-01-02T21:41:14+5:30
राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.
नाशिक : भाजपाची सर्वच विधानसभा विधानक्षेत्रात पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेअंर्तगत राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात विस्तारक नियुक्त करण्यात आले असून, त्यात नाशिक जिल्ह्यात पंधरा पूर्णवेळ कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत, एक वर्षे घरदार सोडून फक्त पक्ष संघटनावर भर देण्यासाठी या कार्यकर्त्यांना दुचाकी देण्यात आल्या आहेत.
दीनदयाळ उपाध्याय यांनी पक्ष विस्तारासाठी घरादाराचा त्याग केला होता. त्यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी योगदान दिले आहे. त्याच धर्तीवर राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातही पक्षासाठी सहा महिने ते वर्षभर पूर्णवेळ देणा-या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी प्रचारक कार्य करीत असून, पक्षाने बुथरचना करताना तो पक्षातील कार्यकर्ता आहे काय, खरोखरीच कोणाची नियुक्ती आहे काय? अशा अनेक बाबींची पडताळणी करताना स्थानिक राजकारण, पक्षाची स्थिती, सामजिक समस्या, अशा मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत विस्तरकांना दुचाकी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुचाकीचे वाटप करण्यात आले आहे.
मोबाइलवर कंट्रोल
विस्तारक म्हणून काम करणा-या कार्यकर्त्यांना अॅँड्रॉइड मोबाइल देण्यात आले असून, त्या माध्यमांतून त्यांचा कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये आहे. भाजपा महाराष्ट्र हे अॅप प्रचारकांच्या मोबाइलमध्ये असून, त्यात असलेल्या बुथ प्रमुख आणि अन्य बुथ कार्यकर्त्यांची यादी, त्यांचे ओटीपी अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.