भाजपाला विरोधकांचा टोला
By admin | Published: May 27, 2017 12:18 AM2017-05-27T00:18:00+5:302017-05-27T00:18:11+5:30
शुक्रवारी महासभेत भाजपा गटनेत्यांनी प्रतिनियुक्तीने अधिकारी मिळण्यासाठी मांडलेल्या अशासकीय प्रस्तावावर विरोधकांनी भाजपाला घेरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका महासभेत सदस्यांकडून मांडण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांबद्दल चर्चा न करता ते थेट आयुक्तांच्या अभिप्रायार्थ पाठविले जातात, असा आजवरचा अलिखित नियम आहे. मात्र, शुक्रवारी (दि.२६) झालेल्या महासभेत भाजपा गटनेत्यांनी प्रतिनियुक्तीने अधिकारी मिळण्यासाठी मांडलेल्या अशासकीय प्रस्तावावर विरोधकांनी भाजपाला घेरले आणि कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर, महापौरांनी सदरचा प्रस्ताव अभिप्रायार्थ पाठवत विरोधकांना गप्प केले.
महासभेत भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी महापालिकेत रिक्त असलेल्या विविध पदांवर प्रतिनियुक्तीने अधिकारी शासनाकडून मिळण्याचा प्रस्ताव मांडला होता. महासभेत आयुक्तांनी ठेवलेल्या प्रस्तावांवरच चर्चा होते आणि निर्णय घेतले जातात. शक्यतो, सदस्यांनी मांडलेल्या अशासकीय प्रस्तावांना फारशी किंमत दिली जात नाही. ते नियमाच्या अधीन राहून थेट अभिप्रायार्थ आयुक्तांकडे पाठविले जातात. आयुक्तांकडूनही त्या प्रस्तावांचे गांभीर्य लक्षात घेऊनच कार्यवाही होते अन्यथा त्याला कचऱ्याचा डबा दाखविला जातो.
संभाजी मोरुस्कर यांनी महापालिकेत शहर अभियंत्यापासून ते आरोग्याधिकाऱ्यापर्यंत सुमारे पंचवीसेक रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि या प्रस्तावाचे वाचनही नगरसचिवाने केले. त्याला विरोधकांनी आक्षेप घेत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी या पदांना लायक नाहीत काय, असा सवाल उपस्थित करत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी, मोरुस्कर आणि राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार यांच्यात शाब्दीक चकमकही झडली. अखेर, महापौरांनी नियमानुसारच सदर प्रस्ताव मान्य होईल असे स्पष्ट करत प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायार्थ पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधक शांत झाले.