भाजपमुळेच राज्यात वीज बिल वसुलीची सक्ती : प्राजक्त तनपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:43 AM2022-03-07T01:43:37+5:302022-03-07T01:44:08+5:30
शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.
पिंपळगाव बसवंत : शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.
अशोकराव बनकर पतसंस्थेत निफाड-ओझर येथील महावितरण कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत तनपुरे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तनपुरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी. राज्यात भारनियमन होऊ दिलेले नाही. भविष्यातदेखील हे संकट येणार नाही याची काळजी घेतली जाईल. कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यासाठी चर्चेची तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे भरल्या पिकाचे नुकसान करू नका. ५० हजारांचे बिल असेल तर ५ हजारांची सवलत द्या, शेतकऱ्यांसोबत संयमाने बोला, त्यासाठी हवं तर ट्रेनिंग घ्या, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आमदार दिलीप बनकर यांनी ९५ हजार आदिवासी असूनदेखील निफाड तालुक्यातील बांधवांना निधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारशे, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय खडारे, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी कुमार, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, आदी उपस्थित होते.
इन्फो
शेजारी कुणी बसले म्हणजे लगेच सरकार बनवतील असा विषय नसतो. कोणताही राजकीय भूकंप होणार नाही. सरकार पाडण्याचा या ना त्या मार्गाने कोणी कितीही प्रयत्न केला तरी पाच वर्षे सरकार टिकेल. विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला तर ते कदाचित सत्तेत येऊ शकतात, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला. ईडीबाबत मात्र तनपुरे यांनी काहीही भाष्य करण्यास टाळले.