प्रभाग सभापती निवडणुकीत भाजपाला गटबाजीची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:33+5:302021-07-16T04:12:33+5:30
नाशिक महापलिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी येत्या सेामवारी (दि.१९) निवडणुका होत आहेत. त्यात अनेक इच्छुकांनी दावे ठोकून अर्ज दाखल झाल्याने ...
नाशिक महापलिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी येत्या सेामवारी (दि.१९) निवडणुका होत आहेत. त्यात अनेक इच्छुकांनी दावे ठोकून अर्ज दाखल झाल्याने ऐनवेळी उमेदवारी देण्यात अडचणी येणार आहेत. पंचवटी विभागात भाजपाचे पूर्ण बहुमत आहे; मात्र तेथे उमेदवारीबाबत एकमत होऊ शकलेले नाही. स्वगृही परतून पक्षात पुन:श्च हरिओम करणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छींद्र सानप यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे; मात्र त्याच बरोबर रूची कुंभारकर आणि पूनम सोनवणे यांनीदेखील अर्ज केले आहेत. हे सध्या विद्यमान आमदार ॲड. राहूल ढिकले यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्येच चुरस असल्याचे सांगण्यात येत आहेत.
नाशिकरोड सुमन सातभाई आणि मीरा हांडगे यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे. सातभाई या सानप गटातल्या तर हांडगे या ढिकले गटातील मानल्या जातात, त्यामुळे उमेदवारी केाणाला मिळते, याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक भाजपातील गटबाजी वाढत असून, यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील हे अखेरचे वर्ष आहे, त्यातच महत्त्वाच्या समित्या आता शिल्लक नसल्याने आता पदे न मिळणाऱ्यांची प्रभाग समितीवर मदार आहे. विशेषत: पूर्व, पश्चिम आणि नाशिकराेड येथे भाजपाला संधी मिळण्याची शक्यता असताना गटबाजीमुळे काय होते, त्याकडे लक्ष लागून आहे.
इन्फो...
नाशिकराेडकडे लक्ष
गेल्या वेळी भाजपातील गटबाजीने शिवसेनेला बाय मिळाला हाेता. उमेदवारी देऊनही भाजपाने माघार घेतली होती. त्यामुळे यंदा भाजपा काय तटबंदी उभारते, याकडे लक्ष लागून आहे.