"महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी"; भाजपाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:20 IST2022-03-14T14:15:18+5:302022-03-14T14:20:06+5:30
नाशिक : देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस (Devendra ...

"महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी"; भाजपाचा गंभीर आरोप
नाशिक : देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष करीत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असून, चौकशीत अडकवून महाविकास आघाडीतील नेत्यांची बाहेर येत असलेली विविध प्रकरणे लपविण्यासाठी फडणवीस यांना चौकशीत अडकले जात असल्याचा आरोप केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (BJP Kapil Patil) यांनी केला आहे.
नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यांसाठी रविवारी (दि.१३) नाशिक दौऱ्यावर असताना आडगाव येथील लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असून, त्यांचे विशेष अधिकार आहेत. या विशेष अधिकारांचाच दाखला देत त्यांनी मिळविलेल्या माहितीविषयी कोणीही प्रश्न विचारू शकत नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपाचे शक्तिस्थान आहे. त्यामुळे शक्तिस्थानावरच वार करून विरोधकांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.